no images were found
नॅनो सायन्सच्या १६० हून अधिक विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय कंपन्यांत प्लेसमेंट: डॉ. किरणकुमार शर्मा
कोल्हापूर, (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड बायोटेक्नॉलॉजीच्या गेल्या दहा बॅचमधील १६० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींची आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध कंपन्या, विद्यापीठांमध्ये प्लेसमेंट्स झालेली आहेत, अशी माहिती संचालक डॉ. किरणकुमार शर्मा यांनी दिली.
विद्यापीठात स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड बायोटेक्नॉलॉजीच्या दहाव्या बॅचचा निरोप समारंभ नुकताच झाला. त्यावेळी ते बोलत होते.
विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय प्लेसमेंट यशामुळे अधिविभागाने सातत्याने आपली गुणवत्ता सिद्ध केली असल्याचे सांगून डॉ. शर्मा म्हणाले, अधिविभागातील विद्यार्थ्यांनी परदेशी विद्यापीठांसह नामांकित उद्योगसंस्थांमध्ये ६५ लाखांपर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळविण्यापर्यंत मजल मारली आहे. ‘बीएससी-एमएससी नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजी’ या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या आजपर्यंत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट्स झालेल्या आहेत. १६० पेक्षा अधिक विद्यार्थी अमेरिका, कॅनडा, युके, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, इटली, इस्राइल, फिनलँड, फ्रान्स, झेक रिपब्लिक, पोलंड, स्वित्झर्लंड, दक्षिण कोरिया, जपान, चीन, सौदी अरेबिया, तैवान तसेच स्वीडन इत्यादी देशांमध्ये कार्यरत आहेत. सहा विद्यार्थी केंद्र सरकारमध्ये तर आठ विद्यार्थी राज्य शासनात विविध पदांवर नियुक्त झाले आहेत. विविध प्रकारच्या नॅनोफॉर्म्युलेशन्स, कोटिंग्ज, फॅब्रिक्स, पेंटिंग, फार्मास्युटीकल्स्, नॅनोमटेरियल्स निर्मिती, पुरवठा तमेच सर्विसेस इत्यादीसाठीच्या विविध राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये तसेच विविध राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संकुलात करिअर प्रोग्रेशनसाठी येथील शंभरपेक्षा अधिक विद्यार्थी नियुक्त झाले आहेत.
प्रतिवर्षी ६५ लाख रुपये पॅकेज मिळविणाऱ्यांमध्ये डॉ. रोहन पाष्टे (मायक्रॉन टेक्नॉलॉजी, तैवान), डॉ. हर्षदा पाटील (मायक्रॉन टेक्नॉलॉजी, सिंगापूर), डॉ. अतुल खोत (सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स, दक्षिण कोरिया), डॉ. किरण निर्मल (सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स, दक्षिण कोरिया), डॉ. शुभम पाटील (नेक्स्टईन सेमीकंडक्टर, दक्षिण कोरिया) यांचा समावेश आहे. विभागातील आठ विद्यार्थ्यांनी भारतात स्वतःच्या स्टार्टअप कंपन्या स्थापित केल्या असून त्या उत्तमरीत्या कार्यरत आहेत. या यशस्वी प्लेसमेंटमुळे अधिविभागाची शैक्षणिक गुणवत्ता आणि संशोधनक्षमता अधोरेखित झाली असून, विद्यार्थ्यांसाठी जागतिक पातळीवरील संधींचे दरवाजे खुले झाले आहेत. या प्लेसमेंट्समध्ये वर्षागणिक वाढ होत आहे, ही अभिमानाची बाब आहे.
बारावी सायन्सनंतर बी.एस्सी.-एम.एस्सी. (नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी) या पाच वर्षांच्या एकत्रित अभ्यासक्रमासाठी तसेच बी.एस्सी. सायन्सनंतर एम.एस्सी. (नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी) या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु झालेला आहे. याच अभ्यासक्रमांच्या माध्यमातून कोल्हापुरासह महाराष्ट्रातल्या तसेच इतर राज्यातल्याही खेडोपाड्यांतील मुलांना आपले उज्ज्वल भवितव्य घडविण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या संधीचा इच्छुक विद्यार्थ्यांनी आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. शर्मा यांनी केले.
यावेळी सन २०२१-२२ मध्ये बी.एस्सी.-एम.एस्सी. (नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजी) या पाच वर्षांच्या एकत्रित अभ्यासक्रमाच्या तसेच सन २०२४-२५ मध्ये एम.एस्सी. अभ्यासक्रमासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. निरोप समारंभात शैक्षणिक वर्षात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. प्रमोद जे. पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. के. व्ही. खोत यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. के. के. पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. तुकाराम डोंगळे, डॉ. प्रमोद कसबे, डॉ. एस. एस. निर्मळे, डॉ. एस.ए. सावंत, डॉ. वाय.वाय. पाटील यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.