no images were found
ग्रामीण केंद्रित जीवनपद्धतीचा स्वीकार करा: बापू महाराज वांयगणकर
कोल्हापूर(प्रतिनिधी):प्रचंड गतीने वाढत असलेला सोशल मीडिया भविष्यात केव्हाही ठप्प होऊ शकतो. यामुळे बँकिंग क्षेत्रापासून ते विमान प्रवासापर्यंतचे सर्व ऑनलाइन व्यवहार विस्कळीत होण्याची शक्यता आहे. या जागतिक संकटाचा सामना करण्यासाठी सर्वांनी आतापासूनच आपल्या गरजा मर्यादित ठेवून ‘ग्रामीण केंद्रित’ जीवनपद्धतीचा स्वीकार करावा, असे आवाहन पूजनीय बापू महाराज वांयगणकर यांनी केले आहे.
मुक्त सैनिक वसाहत परिसरातील सद्गुरु रेवन सिद्धनाथ मंदिरात महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर आयोजित आध्यात्मिक चिंतनात ते बोलत होते. यावेळी त्यांनी भविष्यातील संकटांबाबत अत्यंत गंभीर ‘भाकणूक’ वर्तवली. बापू महाराजांनी सांगितले की, आगामी काळात मानवजातीला कोरोनापेक्षाही भयंकर महामारीला सामोरे जावे लागेल. त्यामुळे जगाची ३० ते ४० टक्के लोकसंख्या कमी होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. तसेच, समुद्रकिनाऱ्यावरील शहरांना सुनामीचा मोठा धोका असल्याचे सांगत त्यांनी सर्वांना पाणी उकळून पिण्याचे व आरोग्यपूर्ण जीवन जगण्याचे आवाहन केले.
देशाच्या आर्थिक भविष्याबद्दल भाष्य करताना ते म्हणाले की, “भविष्यात सोन्याचे दर पाच लाख रुपये, तर चांदी सहा लाख रुपयांपर्यंत पोहोचतील. इतकेच नाही तर पितळेलाही मोठे मोल येईल.” सन २०२७ मध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान मोठे युद्ध होईल. भारत ‘मिशन सिंधू ३-४’ यशस्वीरित्या पूर्ण करेल, मात्र या युद्धामुळे देशाला आणि सर्वसामान्य जनतेला प्रचंड मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल.या सर्व संकटांतून बाहेर पडण्यासाठी भारतीय विचार परंपराच तारून नेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेती बळीराजाचे वैभव: भविष्यात शेती आणि शेतकऱ्याला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त होईल. सात्विक जीवन: सर्वांनी सात्विक विचारांचा अवलंब करून, मर्यादित गरजांमध्ये विवेकी जीवन जगणे ही काळाची गरज आहे.
प्रताप कुंभार नगर येथील सद्गुरु रेवन सिद्धनाथ मंदिराच्या माध्यमातून सकारात्मक जीवनपद्धती आणि ‘सोशल मीडिया विरहित’ मुक्त संवादाचे उपक्रम राबवले जात असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.”मानव जातीच्या कल्याणाचा विचार करणारी भारतीय परंपराच भारताला ‘जगद्गुरु’ बनवेल,” अशा शब्दांत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.आज दिवसभर कोल्हापूर पंचक्रोशीच तळ कोकण गोवा तसेच मुंबई पुणे बेळगाव निपाणी भागातून आलेल्या भाविकांनी या ठिकाणी भेट देऊन दर्शन घेऊन प्रसादाचा आस्वाद घेतला .