no images were found
बिनविरोध निवडणुका सशक्त लोकशाहीचे प्रतीक-हेमंत पाटील : विरोधकांना राजकारण न करण्याचे आवाहन
पुणे : राज्यातील अनेक महानगरपालिका, नगरपालिकांमध्ये बिनविरोध निवडणुका झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.काही विरोधी पक्षांनी यावर आक्षेप नोंदवला असला, तरी बिनविरोध निवडणुका होणे ही बाब सशक्त लोकशाहीचे प्रतीक आहे, असे मत इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी गुरुवारी (ता.८) व्यक्त केले.
राज्यात अनेक ठिकाणी नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये केवळ एका पक्षाचे नव्हे, तर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा समावेश आहे.स्थानिक नेतृत्व किती मजबूत आणि विश्वासार्ह आहे; यावर बिनविरोध निवडणुका अवलंबून असतात, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.जनतेचा स्थानिक नेतृत्वावर विश्वास असल्यास विकासाच्या दृष्टीने बिनविरोध निवडणूक महत्वाची आहे. त्यामुळे अशा निवडणुकांकडे नकारात्मक दृष्टीने पाहण्याऐवजी लोकशाही प्रक्रियेतील सकारात्मक बाब म्हणून पाहिले पाहिजे, असेही पाटील म्हणाले.
बिनविरोध निवडणुकांमुळे अनावश्यक निवडणूक खर्च, प्रशासकीय ताण आणि राजकीय संघर्ष टाळता येतो. अर्थात, लोकशाही मार्गाने निवडणुका होणे अत्यावश्यक आहे, मात्र साम-दाम-दंड-भेद या नीतीचा वापर न करता स्वेच्छेने व लोकशाही पद्धतीने बिनविरोध निवडणुका होत असतील, तर त्यात गैर काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.राज्यात गेल्या काळात निवडणुकांनंतर राजकीय वैमनस्य बाळगून काहींवर हल्ले, काहींची हत्या करण्यात आली. पुरोगामी आणि प्रगलब सुसंस्कृत राजकारणाचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात असे प्रकार शोभनीय नाही, असे देखील पाटील म्हणाले.
लोकशाही अधिक मजबूत व्हावी आणि विकासाला गती मिळावी यासाठी भविष्यात अधिकाधिक बिनविरोध निवडणुका व्हाव्यात, अशी अपेक्षा यानिमित्ताने पाटील यांनी व्यक्त केली.परंतु, बिनविरोध निवडणुकांवर राजकारण होऊ नये , असे मत पाटील यांनी व्यक्त केले.