no images were found
पुण्यात ‘हर हर महादेव’चा शो पाडला बंद, संभाजी ब्रिगेड आक्रमक!
पुणे : बहुचर्चित हर हर महादेव सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या सिनेमात इतिहासाची मोडतोड करून दाखवण्यात आल्याच्या कारणावरून संभाजी बिग्रेड आक्रमक झाली आहे. पिंपरी इथल्या मंगला टॅाकिजमधील सिनेमाचे आजचे नियोजित चार शो रद्द केले आहेत. हर हर महादेवचे शो रद्द करा. पोस्टर काढून टाका अन्यथा परिणामांना सामोरे जा, असं निवेदन संभाजी ब्रिगेडकडून मंगला चित्रपटगृहाच्या संचालकांना दिलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांवर आधारित अनेक सिनेमे प्रदर्शित होत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या हर हर महादेव हा सिनेमातून जो इतिहास दाखवला आहे, तो चुकीचा असल्याच सांगत संभाजी ब्रिगेडनं त्याला विरोध केला आहे. इतकंच नाही तर या सिनेमात इतिहासाची चेष्टा केली आहे. मराठ्यांच्या इतिहासाचा अवमान केला आहे. छत्रपती शिवराय रामदासी वेशात दाखवलं आहे. तसंच या सिनेमात अनेक गोष्टी, घटना दाखवल्या आहेत त्या इतिहासाला धरून नाहीत. त्यामुळे या सिनेमामुळे इतिहासाचा अवमान होत असल्याचं सांगत संभाजी बिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत या सिनेमाचा शो बंद पाडला आहे. इतिहासाची मोडतोड करणारा, खोटा इतिहास दाखवणारा ‘हर हर महादेव’ सिनेमा तात्काळ बंद करावा अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलनं बंद पाडले, असा इशाराही दिला आहे. चित्रपटात छत्रपती शिवराय रामदासी वेषात दाखवण्याचा मुर्खपणा केला आहे. बाजीप्रभू शिवरायांच्या प्रतापगड मोहिमेत दाखवणे म्हणजे इतर मराठा सरदार यांनी शिपायाची भूमिका करण्यासारखं आहे. कान्होजी जेधे खलीता घेऊन बाजीप्रभू यांच्याकडे गेलेले दाखवणे म्हणजे जेधे यांना शिपाई करण्यासारखे आहे, असं संभाजी ब्रिगेडने म्हटलं आहे. छत्रपतींना अफजलखानाने जिरे टोपावर वार केलेला दाखवला आहे. डोक्यातून रक्त येताना दाखवले आहे. हा तर मोठा विनोद आहे. छत्रपतींवर वार करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी हा अफजालखानाचा वकील होता. त्याने छत्रपतींवर वार केलेला होता हे न दाखवता अफजलखानानेच वार केला, असं खोटं दाखवलं आहे, असा आक्षेप संभाजी ब्रिगेडने घेतला आहे.