no images were found
“एकेन बाबू हा असामान्य बुद्धिमत्ता असलेला सामान्य माणूस आहे”: अनिर्बन चक्रवर्ती
मुंबई, : आठ यशस्वी वेब सिरीज सीझन आणि तीन हिट चित्रपटांनंतर बंगालचा लाडका डिटेक्टिव्ह एकेन बाबू आता टेलिव्हिजनवर पदार्पण करत आहे. सोनी सबवर 24 नोव्हेंबर रोजी सुरू होत असलेल्या हिंदीत डबिंग केलेल्या भागांच्या माध्यमातून तो आता देशभरात घराघरात पोहोचणार आहे. या मालिकेत एकेन बाबूची अतरंगी भूमिका साकारली आहे अनिर्बन चक्रवर्तीने. हा डिटेक्टिव्ह सर्वसामान्य डिटेक्टिव्हसारखा नाही. एकेनचा साधेपणा, सूक्ष्म निरीक्षण, मोहकता आणि गूढ उकलण्याची आगळीवेगळी पद्धत यामध्ये त्याचे वेगळेपण दडलेले आहे.
सोनी सबवर ही मालिका सुरू होत असताना, अनिर्बनने त्याची व्यक्तिरेखा, एकेनचा विक्षिप्तपणा आणि या पात्राच्या मोहकतेविषयी आमच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या. त्याचा हा अंश-
1. एकेन बाबू इतका लोकप्रिय होण्यामागचे कारण काय आहे?
मला वाटते की एकेन बाबू हा पहिल्यापासून इतर डिटेक्टिव्ह्जपेक्षा वेगळा उठून दिसला आहे, कारण तो कुणी असामान्य माणूस नाही. तो अगदी सामान्य, साधा माणूस आहे, मात्र त्याचा मेंदू अती तल्लख आहे. लोकांना तो आपलासा वाटतो, कारण तो चारचौघांसारखा आहे. असा कुणीतरी ज्याची आपल्या कुटुंबातही कदर होत नसेल! मात्र जेव्हा तो आपल्या विचित्र मार्गांनी प्रकरण सोडवतो, तेव्हा त्याची हुशारी लक्षात येते. त्याच्यात साधेपणा आणि हुशारी यांचे चे मिश्रण आहे, त्यामुळे तो आपलासा वाटतो.
2. सोनी सबच्या माध्यमातून एकेन बाबू आता नवीन प्रेक्षकावर्गापर्यंत घेऊन जाताना कसे वाटते आहे?
हे फारच खास आहे. अनेक वर्षांपासून एकेन बाबू अशा प्रेक्षकांच्या हृदयात वसला आहे, जे त्याच्या बंगाली कथा वाचत, पाहात आले आहेत. आता सोनी सब वाहिनी देशभरातील हिंदी भाषा जाणणाऱ्या प्रेक्षकांपर्यंत ही मालिका घेऊन जात आहे. जणू आता एकेन बाबू एका मोठ्या जगात पाऊल टाकत आहे. नव्या प्रेक्षकांना त्याचा विक्षिप्तपणा, विनोद आणि कोलकाता शैलीची मोहकता कशी वाटते, हे बघणे रोमांचक आहे.मला या गोष्टीचा आनंद वाटतो की आता जास्तत जास्त लोक त्याची साहसे बघू शकतील.
3. तुझ्या मते अन्य टीव्ही डिटेक्टिव्ह्जपेक्षा एकेन कसा वेगळा आहे?
बहुतांशी डिटेक्टिव्ह एक खास वलय घेऊन येतात. एकेनची निरागसता आधी जाणवते. तो संशयितांना घाबरवत नाही- तो त्यांना निःशस्त्र करतो. त्याची पद्धत अगदी वेगळी आहे, काहीशी बाळबोध वाटावी अशी. पण त्यामुळे ती फारच प्रभावी आहे. आणि हो, त्याची विनोदबुद्धी स्वाभाविक आहे. त्याच्या व्यक्तिमत्तवामधून आणि निरीक्षणातून विनोद उमलतो. डिटेक्टिव्हसारखे न दिसता तो गूढ उकलतो. त्यामुळे तो सगळ्यांपेक्षा वेगळा दिसतो.
4. या मालिकेत रहस्य आणि विनोद यांच्यातील समतोल तू कसा साधलास?
हा समतोल हाच तर एकेन बाबूचा आत्मा आहे. विनोद एकेनच्या व्यक्तिमत्त्वामधून यावा, त्याच्या चाळ्यांमधून नाही, ही मी मनाशी खूणगाठ बांधली होती. त्याचे कुतूहल, त्याच्या प्रतिक्रिया, त्याची देहबोली या सगळ्यातून नर्म विनोद निर्मिती होते. पण जेव्हा गंभीर होण्याची गरज असते, तेव्हा मात्र तो लगेच गंभीर देखील होतो. एक अभिनेता म्हणून, मला या लयीचे भान सतत ठेवावे लागले. प्रकरणावरील प्रेक्षकांचे अवधान हटू न देता त्यांच्या चेहऱ्यावर हसू कसे फुलवायचे हे मला या भूमिकेने शिकवले.
5. एकेनचा विचित्रपणा किंवा लकबी, सवयी यांच्याशी तुला स्वतःचे काही साम्य दिसते का?
मी हे कबूल करतो इतकी वर्षे ही भूमिका करता करता त्याचा विचित्रपणा थोडा मलाही चिकटला आहे! फार गाजावाजा न करता बारीक सारिक तपशील टिपण्याचा स्वभाव मी माझ्या जीवनात देखील अनुसरू लागलो आहे. आणि हो, चांगले-चुंगले खाण्याचे त्याचे प्रेम तर अगदीच माझ्यासारखे आहे.पण आमच्यातील सगळ्यात मोठे साम्य म्हणजे त्याच्यात असलेले कुतूहल. एकेनप्रमाणे मला देखील लोकांना समजून घ्यायला आवडते. त्यांच्या वागण्या-बोलण्याचे निरीक्षण करायला, त्यांच्या कहाण्या ऐकायला आवडते. हे कुतूहल एक अभिनेता म्हणून देखील मला मदत करते.
6. देशभरातील सर्व लोकांना एकेन बाबू आवडेल असे तुला का वाटते?
कारण मुळात एकेन बाबू एक सामान्य माणूस आहे, ज्याची बुद्धिमत्ता असामान्य आहे. प्रत्येक भारतीय कुटुंब त्याच्या सारख्या एखाद्या व्यक्तीला ओळखत असते. एखादे काका, जे साधे दिसतात पण त्यांची बुद्धिमत्ता कुशाग्र असते, एखादा शेजारी असा असतो, ज्याच्या नजरेतून काहीच सुटत नाही, एखादा मित्र असतो, जो तुमच्या समस्येवरअनपेक्षित तोडगा सुचवतो. एकेनचा विनोद सौम्य आहे, त्याचे हृदय मोठे आहे आणि त्याचे डोके अशाप्रकारे चालते की ते पाहताना तुम्हाला हसू येते. त्याच्यातले हे सर्वसामान्य गुणच त्याच्या लोकप्रियतेचे गमक आहे. सर्व भाषा आणि संस्कृतीच्या लोकांना तो आपलासा वाटतो. त्यामुळे मला खात्री आहे की, देशभरातील प्रेक्षक त्याचा प्रेमाने स्वीकार करतील.