no images were found
कोल्हापूर शहरातील वाहतूक विनिमयासाठी वाहतुक शाखेसोबत आढावा बैठक
कोल्हापूर, (प्रतिनिधी ): कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीत वाढत्या वाहतूक कोंडीसह विनिमयातील अडचणी दूर करण्यासाठी तसेच प्रभावी उपाययोजना आखण्यासाठी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज आढावा बैठक झाली. या बैठकीत वाहतूक पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी शहरातील वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या प्रमुख मार्गांची माहिती सादर केली. तसेच या ठिकाणी करावयाच्या सुधारणांची मागणी त्यांनी महानगरपालिकेकडे केली.
या बैठकीत प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी शहराच्या प्रवेशद्वारावर गँट्री बसवून महत्त्वाच्या ठिकाणांकडे जाणारे दिशादर्शक लावण्याचे निर्देश दिले. याशिवाय आवश्यक ठिकाणी माहिती फलक, सावधानतेचे फलक तसेच थर्मोप्लास्ट पट्टे लावण्याची कामे सत्वर पूर्ण करण्याचे आदेश वाहतूक विभागास देण्यात आले. व्यावसायिक आस्थापनांनी त्यांच्या पार्किंगचा योग्य वापर केला जात आहे की नाही याची नगररचना विभागामार्फत तपासणी करण्याच्या सूचनाही दिल्या.
प्रकल्प विभागाने 2025-26 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या रोड विनियमन उपाययोजनांची माहिती या बैठकीत सादर केली. तसेच अतिक्रमण विभागाने शहरातील रस्त्यांवर विनापरवाना करण्यात आलेल्या फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरील चालू कारवाईची माहिती दिली. त्याचबरोबर विभागीय कार्यालयाच्या उप-शहर अभियंता यांनी त्यांचे विभागांमार्फत रस्ते सुधारणा अनुषंगाने करणेत आलेल्या सुधारणांची माहिती या बैठकीत दिली. अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी अतिक्रमण विभाग तसेच वाहतुक पोलीस विभागाच्यावतीने रस्तेवरील अतिक्रमण दुरु करणे अनुषंगाने दैनंदिन कारवाई ठेवणेच्या सुचना बैठकीत दिल्या.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर, निवास पोवार, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, सहाय्यक अभियंता (विद्युत) नारायण पुजारी, तसेच अभियंता (प्रकल्प) सुरेश पाटील उपस्थित होते.