
no images were found
‘जनाची नाहीतर मनाची तरी लाज ठेवा’; ज्येष्ठ नागरिकांनी पालिका कंत्राटदार, अधिकाऱ्याचे काढले वाभाडे
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील रस्त्यांवरून चौफेर टीका सुरु झाल्यानंतर कोल्हापूर मनपा प्रशासनाकडून पॅचवर्कचे काम सुरू करण्यात आले आहे. ज्या पद्धतीने करण्यात येत असलेल्या पॅचवर्कमुळे पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे. कोल्हापूर शहरातील आपटेनगर परिसरातील सिनिअर सिटीझन यांनी पालिका अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरताना कानउघडणी केली. ‘जणाची नाहीतर मनाची तरी लाज ठेवा’ अशा शब्दात सिनिअर सिटीझनकडून अधिकाऱ्यांना फैलावर घेण्यात आले. त्यामुळे अधिकाऱ्यांचा चेहरा पडलेल्या खड्ड्यापेक्षा अधिक पडलेला दिसून आला.
महापालिकेकडून पॅचवर्क करताना सुरु असलेली पद्धत पाहून आपटेनगर परिसरातील वरिष्ठ नागरिकांचा पारा चांगलाच चढल्याचे दिसून आले. चला खड्डे पडलेले दाखवतो, असे म्हणतच त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांचे वाभाडे काढले. जणाची नाहीतर मनाची तरी लाज ठेवा, का पाकिट संस्कृती आहे तुमची? पाकिट घेतलं की झालं? कंत्राटदारांनी पाकिट घेऊन तुमच्या सारख्या लोकांना पालिका अधिकारी बदनाम केल्याचेही सिनिअर सिटीझन म्हणाले. आम्ही दंगा केल्यानंतर करून देतो म्हणण्याची पद्धत नको असल्याचेही ते म्हणाले. क्प्ळापूर शहर खड्ड्यात गेल्याने शहरातील वाहनांसह नागरिकांच्या हाडांचा खुळखुळा झाला आहे. खड्डा नेमका कोणता चुकवायचा आणि चुकवला तरी दुसऱ्या खड्ड्यात गेल्याशिवाय राहत नाही, अशी परिस्थिती झाली आहे.
काही दिवसांपूर्वीच कोल्हापूर महापालिकेतील अभियंत्याच्या आईचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला होता. यानंतर मनपाकडून पॅचवर्कचे कामी हाती घेण्यात आले आहे. मात्र, ते करताना त्यामध्ये कोणताही दर्जा नसल्याचे दिसून आले आहे . दुसरीकडे आईच्या मृत्यूला कारणीभूत ठरवत संबंधित अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्याचा पराक्रम कोल्हापूर पोलिस आणि मनपा प्रशासनाने केला आहे .या बद्धल संताप व्यक्त होत आहे.