
no images were found
त्यांच्याकडे ईडी, सीबीआय, सत्ता, पोलिस,
आमच्याकडे भारतमाता : योगेंद्र यादव
सांगली : स्वराज्य इंडिया पक्षाचे संस्थापक योगेंद्र यादव यांनी ‘दीवार’ चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग ऐकवत भाजप आणि मोदी सरकारवर कडाडून हल्लाबोल केला. ईडी, सीबीआय, सत्ता, पोलीस आता मीडिया सगळेच त्यांच्यासोबत आहेत, पण आमच्याकडे भारतमाता असल्याचे ते म्हणाले. राहुल गांधी यांच्या भारत जोडोला समर्थन देण्याची सांगलीकर जनतेला आवाहन त्यांनी केले
योगेंद्र यादव पुढे म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत देशात महागाई, बेरोजगारी वाढली आहे, पण त्याची माध्यमांत चर्चा होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातही हे मुद्दे नसतात. दिल्लीतील राज्यकर्ते या मुद्दयांपासून जनतेला भटकविण्यासाठी हिंदू-मुस्लीम करीत असतात. देशात बलात्कार, खून करणाऱ्यांचा सन्मान होत आहे. संविधान, लोकशाहीची मूल्ये नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या साऱ्यांविरोधात राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. या यात्रेचा परिणाम दिसून येत आहे. देशातील सध्याची परिस्थती बदलण्यासाठी जात, धर्म, पक्ष विसरून रस्त्यावर उतरण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
योगेंद्र यादव यांची कोल्हापूरमध्येही काल भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ सभा झाली. यावेळी ते म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी समतेचा संदेश देशाला दिला, त्याच भूमीतून आम्ही समतेचा संदेश घेऊन जनसंवाद यात्रा बिंदू चौकातून सुरू करीत आहोत. संविधान बचाओ, देश बचाओ, भारत जोडो असा नारा देत कोल्हापूर ते नांदेड या मार्गावरही यात्रा निघणार आहे, असेही यादव यांनी सांगितले. विरोधात आवाज उठवणाऱ्यांच्या मागे इडी लावली जाते. तुरुंगात घालण्याची भाषा होते. सामान्यांना भीती दाखवली जाते. जेव्हा एकटी व्यक्ती घाबरू शकते, त्यावेळी मात्र जनता एकत्र येते तेव्हा भीती पळून जाते. सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील आवाज वाढतो आहे. त्याचे प्रतीक म्हणून या समता यात्रेत समविचारी पक्षांच्या सहभागाने भारत जोडो यात्रा सुरू झाली आहे .