no images were found
नाविन्यपूर्ण उपक्रमातून महसूल सप्ताह यशस्वी करा – जिल्हाधिकारी
कोल्हापूर : शासनाच्या कामकाजाप्रती नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत होण्यासाठी महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा, योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करून महसूल सप्ताह यशस्वी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बैठकीत दिल्या. दिनांक १ ते ७ ऑगस्ट यादरम्यान होणारा महसूल सप्ताह प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्हास्तरीय अधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगर प्रशासन अधिकारी यांची नियोजन बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शाहूजी सभागृहात संपन्न झाली. १ ऑगस्ट रोजी महसूल दिन आयोजित करून महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. तसेच दिनांक १ ते ७ ऑगस्ट या दरम्यान जिल्ह्यात महसूल सप्ताहामध्ये विविध अभियान तसेच कार्यक्रमांमधून नागरिकांना योजनांचे लाभ वितरित केले जाणार आहेत.
या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हाधिकारी महसूल डॉ.संपत खिलारी यांच्यासह जिल्हास्तरावरील अधिकारी तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी उपस्थित होते.
या सप्ताह मध्ये आयोजित कार्यक्रमांना जिल्ह्यातील गाव स्तरापासून जिल्हास्तरावरच्या सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात येणार असून मोठ्या प्रमाणात नागरिकांनीही या अभियानात सहभाग नोंदवून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. महसूल सप्ताहामध्ये आयोजित कार्यक्रमांसाठी महसूल विभागाबरोबरच ग्रामविकास तसेच इतर सर्व शासनाच्या विभागांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.
महसूल प्रशासनातील प्रत्येक स्तरावर प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपला सक्रिय सहभाग यामध्ये नोंदवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. प्रत्येक कार्यालया अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून जास्तीत जास्त लाभ वितरित करून महसूल सप्ताह यशस्वी करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
महसूल सप्ताहाच्या आयोजनातून शासकीय लाभ समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचेल याची दक्षता घ्यावी. प्रत्येक कार्यक्रमाचे, योजनेची प्रसिद्धी करून जास्तीत जास्त लोकांना माहिती उपलब्ध करून द्यावी. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानासाठी जिल्हा स्तरावर पर्यवेक्षण अधिकारी नेमण्यात येणार असून महाराजस्व अभियान यशस्वी होईल याची दक्षता घ्या अशा सूचना त्यांनी या बैठकीत दिल्या.