
no images were found
दलित तरुणाला मारहाण; अर्धी मिशी कापली; तोंडाला काळं फासलं, बाजारात फिरवलं
बहराईच : चोरीच्या आरोपावरून एका दलित तरुणाला तालिबानी शिक्षा देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या बहराईचमध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
चोरीच्या आरोपाखाली दलित तरुणाला पकडण्यात आलं. त्याला विजेच्या खांबाला बांधण्यात आलं. तरुणाच्या तोंडाला काळं फासून त्याला गावात फिरवण्यात आलं. त्याची अर्धी मिशी कापण्यात आली. अनेकांनी या घटनेचं चित्रिकरण करून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल केला.
बहराईचमधील हरदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. शौचालयाची सीट चोरी करण्याच्या आरोपाखाली काही जणांनी दलित तरुणाला पकडलं आणि त्याला तिथेच शिक्षा देऊ लागले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पीडितानं दिलेल्या तक्रारीवरुन तिघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. राधेश्याम मिश्रा, रेणू वाजपेई आणि राकेश तिवारी अशी आरोपींची नावं आहेत.
या प्रकरणी तिघांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून दोघांना तुरुंगात टाकण्यात आलं आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अशोक कुमार यांनी दिली.