
no images were found
‘ए.डी. सायंटिफिक इंडेक्स’च्या ताज्या क्रमवारीत शिवाजी विद्यापीठाचे ८० संशोधक
कुलगुरू, प्र-कुलगुरूंचाही समावेश; विद्यापीठास देशात २५ वे स्थान
कोल्हापूर : ‘ए.डी. सायंटिफिक इंडेक्स’तर्फे नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या ‘वर्ल्ड सायंटिस्ट अँड युनिव्हर्सिटी रँकिंग-२०२३’मध्ये शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह एकूण ८० संशोधक-प्राध्यापकांचा समावेश झालेला आहे.
एच इंडेक्स, आय-१० इंडेक्स आणि विविध सायटेशन्सच्या आधारे काढण्यात आलेल्या या निर्देशांक यादीमध्ये मागील वर्षी असलेल्या संशोधकांनी त्यांचे स्थान कायम राखले असून यंदा आणखीही संशोधकांचा त्यात समावेश झालेला आहे. शिवाजी विद्यापीठास देशातील ११०३ शैक्षणिक संस्थांच्या यादीत देशात २५ वे स्थान प्राप्त झाले आहे. या यादीमध्ये प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांचा एच-इंडेक्स हा सर्वाधिक म्हणजे ७९ इतका आहे तसेच, त्यांच्या संशोधनास ४६,४०८ इतकी प्रचंड सायटेशन्सही प्राप्त झाली आहेत.
नॅक ‘अ++’ मानांकित शिवाजी विद्यापीठासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. एडी सायंटिफिक इंडेक्स, जर्नल्स आणि विद्यापीठांचे मूल्यमापन करणार्याम इतर प्रणालींपेक्षा वेगळी आहे. यात शास्त्रज्ञांच्या संशोधनातील कामगिरी आणि वैयक्तिक वैज्ञानिक उत्पादकतेच्या अतिरिक्त मूल्यावर आधारित क्रमवारी आणि विश्लेषण करण्यात आले आहे. शिवाय शास्त्रज्ञांच्या वैज्ञानिक वैशिष्ट्यांवर आधारित संस्थांची क्रमवारी काढली जाते. एच-इंडेक्सच्या आधारे भारतातील ११०३ संस्थांच्या क्रमवारीत शिवाजी विद्यापीठाने २५ वे स्थान मिळवले आहे. शिवाजी विद्यापीठ मटेरियल सायन्स संशोधनात सर्वोत्तम संस्थांपैकी एक म्हणून ओळखले जाते. तथापि, सदरची क्रमवारी विविध विद्याशाखांमधील संशोधनावर आधारित आहे.
कुलगुरू डॉ. शिर्के यांनी संख्याशास्त्र विषयात संशोधन केले आहे. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांना भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी क्रमवारीत आघाडीचे स्थान प्राप्त झाले आहे. सदर यादीत आजी-माजी संशोधकांसह देश-विदेशांत कार्यरत संशोधक विद्यार्थी-शिक्षकांसह निवृत्त प्राध्यापकांचाही समावेश आहे.