no images were found
अक्षय,इंद्रजीत,केवल व मिहीर संयुक्तपणे आघाडीवर
कोल्हापूर : महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना व कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने राम गणेश गडकरी हॉल, पेटाळा येथे चेस असोसिएशन कोल्हापूर ने आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य खुल्या निवड गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीनंतर चांगली चुरस निर्माण झाली आहे. ही स्पर्धा बँक ऑफ महाराष्ट्र ने पुरस्कृत केले आहे.स्पर्धेच्या आज झालेल्या पाचव्या फेरीनंतर अग्रमानांकित पुण्याचा कॅंडिडेट मास्टर अक्षय बोरगावकर सह तृतीय मानांकित औरंगाबादचा इंद्रजीत महिंद्रकर,केवल निर्गुण( पुणे)व मिहीर सरवदे (पुणे) हे चौघेजण साडेचार गुणासह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. सहावा मानांकित पुण्याचा विरेश शरणार्थी सह श्रयन मुजुमदार मुंबई, रचित गुरुनानी मुंबई, रुपेश भोगल मुंबई, अनिकेत बापट सातारा आदित्य सावळकर कोल्हापूर, गणेश ताजणे नाशिक,अथर्व मडकर पुणे व रियान शहा मुंबई हे नऊ जण चार गुणासह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत. पाचवा मानांकित कोल्हापूरचा श्री राज भोसले सह दिशांक बजाज नागपूर, आदित्य बारटक्के मुंबई,वेदांत नगरकट्टे मुंबई,युवान बोरीचा मुंबई, प्रणव पाटील कोल्हापूर, प्रदीप आवडे सातारा, अथर्व चव्हाण कोल्हापूर, शर्विल पाटील कोल्हापूर, शशांक के मुंबई, गुरुवन शहा मुंबई व दीपंकर कांबळे फलटण, हे सर्वजण साडेतीन गुणासह संयुक्तपणे तृतीय स्थानावर आहेत.
आज सकाळी सुरू झालेल्या पाचव्या फेरीचे सुरुवात माईसाहेब बावडेकर स्कूलचे संचालक नीलराजे बावडेकर व कुलकर्णी स्टील प्रायव्हेट लिमिटेड चे प्रोप्रायटर मदन कुलकर्णी यांच्या वतीने करण्यात आली.पाचव्या फेरीत पहिल्या पटावर तृतीय मानांकित औरंगाबादच्या इंद्रजीत महिंद्रकर विरुद्ध पुण्याच्या मिहीर सरवदे यांच्यातील सीसीलियन बचाव पद्धतीने सुरू झालेल्या डावात दोघांनी तोडीस तोड खेळ्या करत एकमेकास रोखून धरले होते शेवटी डाव 47 चाली नंतर बरोबरीत सुटला.दुसऱ्या पटावर अग्रमानांकित पुण्याचा अक्षय बोरगावकर विरुद्ध प्रदीप आवडे यांच्यातील सामना ही सीसीलियन बचाव प्रकाराने सुरू झाला.स्पर्धेचे मुख्य आंतरराष्ट्रीय पंच नितीन शेणवे यांनी स्पर्धा चालू असताना नियमानुसार अन्य खेळाडू व व्यक्तींशी स्पर्धकांनी कोणतीही चर्चा करण्यास मनाई केली होती परंतु अठराव्या चालीस प्रदीपकडून नकळत इतरांशी बोलण्याची चूक झाली त्यामुळे प्रदीप ला पंचानी पराभूत ठरविले व अक्षयला गुण बहाल केला. तिसऱ्या पटावर मुंबईचा श्रयन मुजुमदार विरुद्ध कोल्हापूरचा आदित्य सावळकर यांच्यातील क्विन्स गॅम्बिट डिक्लाईन प्रकाराने सुरू झालेल्या डाव 34 चालीनंतर बरोबरीत सुटला.चौथ्या पटावर पुण्याच्या केवल निर्गुण ने सिमेट्रिकल इंग्लिश प्रकाराने सुरू झालेल्या डावात मुंबईच्या ओम गडा ला 48 व्या चालीस डाव सोडण्यास भाग पाडले.पाचव्या पटावर पुण्याच्या वीरेश शरणार्थीने कोल्हापूरच्या प्रणव पाटील विरुद्ध किंग्स इंडियन डिफेन्स प्रकाराने सुरू झालेल्या डावात 42 चालीत विरेशने प्रणववर विजय मिळविला.सातारची अंध बुद्धिबळपटू संस्कृती मोरेने मानांकित कोल्हापूरच्या हित बलदवाला बरोबरीत रोखत आजचा दिवस ही गाजविला.मुंबईच्या रियान शहाने सोलापूर च्या मानांकित मानस गायकवाडला पराभूत केले तर मुंबईच्या पूर्वान शहाने मुंबईच्याच मानांकित वेदांत नगरकट्टे ला बरोबरीत रोखले.इचलकरंजीच्या रियार्थ पोदार ने मुंबईच्या मानांकित सोहम पवार वर लक्षवेधी विजय मिळविला.कोल्हापूरच्या शर्विल पाटील ने मुंबईच्या मानांकित आदित्य बारटक्केला बरोबरीत रोखले
तत्पूर्वी काल झालेली चौथी फेरी कोल्हापूर कॉम्प्युटर असोसिएशनचे माजी अध्यक्ष व कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे विद्यमान संचालक प्रकाश पुणेकर आणि आयुर्विमा महामंडळाचे निवृत्त वरिष्ठ अधिकारी व रंगकर्मी अँडव्होकेट सागर पिलारे यांच्या वतीने सुरू करण्यात आली.पहिल्या पटावर तृतीय मानांकित औरंगाबादच्या इंद्रजीत महेंद्रकरने पुण्याच्या कुशाग्र जैनचा पराभव केला तर दुसऱ्या पटावर मुंबईचा श्रयान मुजुमदार व मुंबईचाच ओम गडा यांच्यातील डाव बरोबरीत सुटला.तिसऱ्या पटावर पुण्याच्या मिहीर सरवदे ने मुंबईच्या रियान शहा वर विजय नोंदविला.कोल्हापूरच्या अरिना मोदी ने सातारचे मानांकित वेदांत डोईफोडे ला पराभवाचा धक्का दिला. स्पर्धेतील अंध बुद्धिबळपटू सातारच्या संस्कृती मोरेने औरंगाबादच्या मानांकित चंद्रशेखर खडके ला पराभूत करताना सर्वांचे लक्ष वेधून घेतले.