
no images were found
किणी टोलनाक्यावर पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये झटापट
कोल्हापूर : मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक होत किणी टोल नाक्यावर जोरदार आंदोलन केले. मुदत संपलेली असतानाही टोल वसुली करण्यात येत असल्याने मनसेने हे आंदोलन केले. यावेळी आंदोलनावेळी पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. यानंतर पोलिसांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांना ताब्यात घेतले आहे.
मुदत संपूनही वसुली सुरू असलेल्या पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोल नाक्यावर मनसेने आज पुन्हा आंदोलन केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी मनसे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना टोलनाक्यांचा मुद्दा मांडला होता. मनसेच्या राज्यभरातील आंदोलनामुळे ६५ टोलनाके बंद झाल्याचे राज ठाकरे म्हणाले होते. या मुद्द्याला कोणत्याही राजकीय पक्षाने हात घातले नाही. मात्र मनसेने यावर आक्रमक भूमिका घेतल्याचे राज ठाकरे भाषणात म्हणाले होते. दरम्यान अद्यापही काही ठिकाणी टोल नाके सुरू असून हे टोलनाके बंद करण्यासाठी मनसे आक्रमक झाली आहे. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील किनी टोल नाका बंद करण्यात यावा, यासाठी आज मनसेने टोल नाक्यावर जोरदार आंदोलन केले. मुदत संपलेली असतानाही टोल वसुली करत असल्याने मनसेने आक्रमक भूमिका घेत टोल वसुली थांबवा, अशी मागणी यावेळी केली. या आंदोलनादरम्यान पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत केली आहे.