
no images were found
बिल्किस बानो प्रकरणातील एका दोषीविरोधात विनयभंगाचा गुन्हा
अहमदाबाद : गुजरातमधील बिल्किस बानो प्रकरणातील तुरुंगातून सुटका झालेल्या एका दोषीविरोधात तो पॅरोलवर असतानाच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुजरात सरकारकडुन सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही बाब समोर आली आहे.
बिल्किस बानो प्रकरणातील दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. गुजरात सरकारने या चांगल्या वर्तवणुकीच्या कारणाखाली त्यांची तुरुंगातून सुटका केली होती. गुजरात सरकारच्या या निर्णयावर देशभरातून टीका सुरू झाली आहे. काहींनी या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.
2002 साली उसळलेल्या गुजरात दंगलीतल्या सर्वांत भयंकर घटनेपैकी एक म्हणजे बिल्किस बानो यांचं प्रकरण. या दंगलीमुळे बिल्किस बानो याचं आयुष्यच बदलून गेल. या दंगलीमध्ये पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या १९ वर्षांच्या बिल्किस बानोवर यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. बिल्किस बानो यांच्या तीन वर्षांच्या चिमूरडीला तिच्या डोळ्यांदेखत जमिनीवर आपटून तिची हत्या करण्यात आली. बिल्किस बानो यांची आई, दोन दिवसांचीच बाळांतीण असलेली बहिण यांच्यासह तिच्या १४ नातलगांचा संतप्त जमावाने जीव घेतला होता.