no images were found
न्यायाधीशांचीच फसवणूक, मोबाईल मॅसेजवरून ३ लाखाचा गंडा
भंडारा : सायबर क्राईममध्ये सध्या वाढच होत चालली आहे. अनेक लोक सायबर क्राईमला बळी पडताना दिसत आहेत. नुकतीच न्यायाधीशांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची बातमी समोर आली आहे. भंडारा येथील न्यायाधीशांना एका भामट्याने वीज बिल भरण्याच्या नावाखाली ३ लाखाचा गंडा घातला आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भंडारा येथील न्यायाधीश चारुदत्त देशपांडे यांची ऑनलाईन वीज बील भरण्यावरून फसवणूक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. उपलब्ध माहितीनुसार, न्यायाधीश चारुदत्त लक्ष्मीकांत देशपांडे यांच्या मोबाईलवर एक मॅसेज आला होता. त्यात आले वीज बिल थकीत असून तत्काळ न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्यात येईल असे नमूद होते. यावरून न्या. देशपांडे यांनी संबंधित नंबरवर फोन केला. तेव्हा ‘क्विक सपोर्ट’ हे अॅप इन्स्टॉल करण्यास सांगितले गेले त्यावर आलेली लिंक शेअर करून 11 रुपये पाठविण्यास सांगितले.
न्या. देशपांडे यांनी 11 रुपये नेट बँकिंगद्वारे जमा केले असता त्यांच्या स्टेट बँकेच्या खात्यातून प्रथम 99 हजार 990 रुपये, दुसऱ्यांदा परत तेवढेच तर तिसऱ्यांदा 99 हजार 998 रुपये असे एकूण 2 लाख 99 हजार 978 रुपये एका क्रेडिट कार्डद्वारे ट्रान्सफर झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात येताच न्या. देशपांडे यांनी भंडारा ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरुन पोलिसांकडून अज्ञाताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.