no images were found
महिलांना संधीचा अभाव ही गंभीर सामाजिक समस्या: डॉ. जगन्नाथ पाटील
कोल्हापूर,(प्रतिनिधी): शालेय व महाविद्यालयीन परीक्षांमध्ये मुली सातत्याने अव्वल येत असतानाही उच्च शिक्षण, संशोधन आणि कामकाजाच्या ठिकाणी नेतृत्वाच्या पातळीवर त्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी दिसते. ही संधीच्या अभावाची परिस्थिती समाजातील आर्थिक प्राधान्यक्रम, पितृसत्ताक मानसिकता आणि संस्थात्मक अडथळ्यांमुळे निर्माण झालेली गंभीर सामाजिक समस्या आहे, असे प्रतिपादन जागतिक ख्यातीचे शिक्षणतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ पाटील यांनी केले.
शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त स्त्री अभ्यास केंद्र, बेटी बचाओ अभियान, श्रीमती शारदाबाई पवार अध्यासन, केंद्रीय तक्रार निवारण समिती आणि शिक्षणशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिला आणि मुलींसाठी हक्क, न्याय आणि कृती’ या विषयावर आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत बीजभाषक म्हणून ते बोलत होते. प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव अध्यक्षस्थानी होत्या, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे प्रमुख उपस्थित होते.
डॉ. पाटील म्हणाले, दहावी-बारावीच्या निकालांमध्ये मुली मोठ्या प्रमाणात अव्वल येतात. अनेक विद्यापीठांतील सुवर्णपदकेही मुलींनाच मिळतात; मात्र काही वर्षांनंतर या प्रतिभावान मुली उच्च शिक्षण, संशोधन किंवा व्यावसायिक क्षेत्रात फारशा दिसत नाहीत. शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर महिलांची संख्या कमी होत जाण्याच्या या प्रक्रियेला जगभरात ‘लिकी पाइपलाइन’ असे संबोधले जाते. कुटुंबातील आर्थिक निर्णयांमध्ये मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य देणे, ग्रामीण भागात मुलींना उच्च शिक्षणासाठी बाहेर पाठवण्याबाबतचा संकोच, तसेच विवाह आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे महिलांच्या करिअरमध्ये येणारा खंड ही या समस्येची प्रमुख कारणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जागतिक स्तरावरील अभ्यासांचा उल्लेख करताना डॉ. पाटील म्हणाले, विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात शिक्षण घेताना मुलींचे प्रमाण चांगले असले तरी संशोधन आणि नेतृत्वाच्या पदांवर त्यांची उपस्थिती कमी आहे. महिलांना समान संधी दिल्यास देशाच्या आर्थिक वाढीतही मोठी भर पडू शकते. या समस्येवर उपाय म्हणून उच्च शिक्षणासाठी मुलींना अधिक शिष्यवृत्ती, कार्यक्षेत्रात लवचिक कामकाज पद्धती, बालसंगोपनासाठी आवश्यक सुविधा, तसेच शिक्षण व प्रशासनातील महत्त्वाच्या पदांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढविण्याची गरज आहे. समाजातील मानसिकता बदलणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगत, मुलींच्या शिक्षणाला व करिअरला प्राधान्य दिल्यास देशाच्या विकासाला नवी दिशा मिळू शकते, असे त्यांनी सांगितले.
कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, शिवाजी विद्यापीठात पदवी घेणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या गेल्या दशकभरात सातत्याने ५० टक्क्यांहून अधिक राहिली आहे. तथापि, पुढील कारकीर्दीमध्ये त्यांचे प्रमाण तितके राहात नाही, हे चिंताजनक आहे. त्यासाठी महिला समानतेची आणि सक्षमीकरणाची सुरवात ही घरापासून होणे अत्यावश्यक आहे.
सुदृढ समाजासाठी महिलांना त्यांचे न्याय्य हक्क प्रदान करणे आवश्यक असल्याचे सांगताना प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव म्हणाल्या, समतेच्या संदेशाचे सार्वत्रिकीकरण होत नाही, तोवर सुदृढ समाज घडणार नाही. स्त्रियांप्रती आदर असलेल्या समाजाचीच भरभराट होत असते. म्हणूनच महिला दिवस हा उत्सवीकरणाचा नव्हे, तर सक्षमीकरणाच्या संदर्भात आपण कुठवर पोहोचलो आहोत, याचे पुनरावलोकन करीत पुढील वाटचालीची दिशा निश्चित करण्याचा आहे, याचे भान बाळगणे गरजेचे आहे.
उद्घाटनानंतर दुसऱ्या सत्रात पुणे येथील जेएसपीएम विद्यापीठाच्या डॉ. ज्योती शिंदे, शहाजी लॉ महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. प्रविण पाटील आणि ज्येष्ठ संपादक डॉ. विजय चोरमारे यांनी मार्गदर्शन केले.
स्त्री अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ. निशा मुडे-पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शारदाबाई पवार अध्यासनाच्या समन्वयक डॉ. भारती पाटील यांनी परिचय करून दिला. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. चेतना सोनकांबळे यांनी आभार मानले. यावेळी मंचावर डॉ. माधुरी वाळवेकर, डॉ. प्रतिभा देसाई होत्या. कार्यक्रमास विविध अधिविभागांतील शिक्षिका, संशोधक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.