
no images were found
हिंदू मंदिरांची सात्त्विकता राखा; इतर धर्मीय कर्मचाऱ्यांचा प्रवेश थांबवा! – महाराष्ट्र मंदिर महासंघ
कोल्हापूर (प्रतिनिधी): -कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धास्थान असलेल्या श्री शनिशिंगणापूर मंदिराच्या पवित्र चौथऱ्यावर २१ मे २०२५ रोजी मुसलमान कर्मचाऱ्यांमार्फत ग्रील बसवण्याचे काम करण्यात आले. ही घटना अत्यंत धक्कादायक असून मंदिराच्या सात्त्विकता आणि धार्मिक परंपरा यांचा स्पष्ट भंग करणारी आहे. या प्रकारामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेचा महाराष्ट्र मंदिर महासंघाने तीव्र निषेध केला असून महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी म्हटले आहे की, संबंधित मुसलमान कर्मचाऱ्यांचे काम तात्काळ थांबवण्यात यावे, या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या ३०० मुसलमान कर्मचाऱ्यांना हटवण्यात यावे, तसेच त्यांना प्रवेश देणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा संपूर्ण राज्यभर तीव्र जनआंदोलन छेडले जाईल.
श्री. घनवट पुढे म्हणाले की, शनिशिंगणापूरसारख्या पवित्र देवस्थानात मांसाहार करणाऱ्या इतर धर्मीय व्यक्तींना काम देणे हे हिंदू समाजाच्या श्रद्धेला आणि परंपरेवरील मोठा आघात आहे. सध्या देवस्थानमध्ये सुमारे ३०० मुसलमान कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती असून अशा कर्मचाऱ्यांना मंदिराच्या अंतर्गत कार्यरत ठेवणे हे धार्मिक रितीरिवाज आणि मंदिराच्या सात्त्विकतेवर प्रत्यक्ष आघात करणारे आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र मंदिर महासंघाने देवस्थानच्या विश्वस्तांशी संपर्क साधून सदर काम तात्काळ थांबवण्याची मागणी केली असता विश्वस्तांनी काम थांबवण्यात आल्याचे सांगितले आहे. तरीसुद्धा ज्या अधिकाऱ्यांनी हे काम दिले आणि मुसलमान कामगारांची नियुक्ती केली, त्यांच्यावर कारवाई होणे अत्यावश्यक आहे.
तेलंगणातील तिरुपती बालाजी मंदिरातही अशा प्रकारची घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी फक्त हिंदू कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. महाराष्ट्र सरकारनेही तत्काळ अशीच ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी महासंघाने या वेळी केली. हिंदू मंदिरात व्यक्तींचे आचरण, आहार, श्रद्धा आणि भावना या सर्व गोष्टी त्या पवित्रतेशी सुसंगत असाव्या लागतात. अशा पवित्रस्थळी त्याचे पालन न करणाऱ्या इतर धर्मीय कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे, ही मंदिराच्या धार्मिक शुद्धतेवर आणि परंपरेवर होणारी थेट आघात असून शासनाने हे गांभीर्याने घ्यावे, असेही श्री. घनवट यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे.