
no images were found
अलमट्टी धरणाच्या प्रस्तावित उंची वाढीला महाराष्ट्राचा पूर्ण विरोध, खासदार धनंजय महाडिक यांनी मांडली केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांसमोर भुमिका
कोल्हापूर (प्रतिनिधी):-कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घाट घातला आहे. त्याला महाराष्ट्राचा पूर्ण विरोध आहे. या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक यांनी, केंद्रीय जलशक्ती मंत्री नामदार सी. आर. पाटील यांची भेट घेतली. बुधवारी मुंबईत मंत्रालयात जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत अलमट्टीच्या प्रस्तावित उंची वाढीला विरोध दर्शवण्यासाठी बैठक झाली. त्याला अनुसरून खासदार महाडिक यांनी नवी दिल्लीत केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना निवेदन दिले. अलमट्टी धरणाची उंची वाढवली तर कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्हयात महापूराचे संकट अतिगंभीर होवू शकते. तर कित्येक भूभाग कायमचा पाण्याखाली जावू शकतो. त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्हयातील नागरिकांच्या अलमट्टी विरोधात तीव्र भावना आहेत. त्याबद्दल खासदार महाडिक यांनी, केंद्रीय मंत्र्यांसमोर वस्तुस्थिती मांडली. महाराष्ट्रासह आंध्र आणि तेलंगणा राज्याचाही अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याच्या प्रस्तावाला तीव्र विरोध आहे. केंद्रीय लवादाने धरणाची उंची वाढवण्यास हिरवा कंदिल दिला असला तरी, वास्तविक स्वरूपात अलमट्टीची उंची वाढवणं व्यवहार्य नाही. त्यामुळेच अलमट्टीची उंची वाढवण्याचा प्रश्न आता सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असून, महाराष्ट्र सरकारने यापूर्वी सुध्दा धरणाच्या उंची वाढीला विरोध दर्शवला आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी कोणताही निर्णय दिलेला नाही. तर केंद्र सरकारने सुध्दा अलमट्टी धरणाच्या प्रस्तावित उंची वाढीला परवानगी दिलेली नाही. अशा परिस्थितीत कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रयत्न करू नये, किंवा महाराष्ट्राच्या जनतेमध्ये भिती निर्माण होईल, असे वक्तव्य करू नये, अशी अपेक्षा खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्हयातील हजारो नागरिकांच्या शेत जमीनी, घरे बुडवणार्या अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याला केंद्र सरकारने परवानगी देवी नये, अशी ठाम भुमिका खासदार महाडिक यांनी घेतली आहे. त्याला केंद्रीय मंत्री नामदार सी.आर. पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. याप्रश्नी लवकरच एक व्यापक उच्चस्तरीय बैठक बोलावू आणि मार्ग काढू असे सांगितले आहे.