
no images were found
‘सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सवासाठी २० सहस्र भाविकांची उपस्थिती !
फोंडा, गोवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेनगरी) – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने गोवा येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ होत आहे. हा शंखनाद म्हणजे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची नांदीच आहे. या ठिकाणी भारतासह विदेशातूनही साधू, संत, विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रमुख, पदाधिकारी आले आहेत. या सर्वांना हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रेरणा या महोत्सवाच्या माध्यमातून मिळत आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून जगभरातील हिंदूंनी उर्जा घेऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्न करायला हवेत, असे मत या कोल्हापूर येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांनी महोत्सवस्थळी व्यक्त केले.
या प्रसंगी हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. आनंदराव पवळ आणि तालुका संयोजक श्री. अमर जाधव, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कोल्हापूर जिल्हा सहसंयोजक श्री. अभिजित पाटील, ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सुनील सामंत, अखिल भारतीय हिंदू महासभा जिल्हाध्यक्ष श्री. राजू तोरस्कर आणि जिल्हा उपाध्यक्ष श्री. विकास जाधव, वीर शिवा काशीद यांचे तेरावे वंशज श्री. आनंदराव काशीद, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोल्हापूर जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, हिंदुत्वनिष्ठ श्री. रामभाऊ मेथे यांसह अन्य उपस्थित आहेत.
या ठिकाणी अफझलखानवधाचा भव्य फलक लावण्यात आला असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील प्राचीन शस्त्रास्त्रे यांच्या प्रदर्शन कक्षास मोठा प्रतिसाद मिळत आहे. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष यांचे औचित्य साधून येथील फर्मागुडी येथील इन्फिनिटी मैदानावर १७ ते १९ मे या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून दीड हजारपेक्षा अधिक साधक, हिंदू धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ सहभागी आहेत.
या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी व थेट प्रक्षेपणासाठी भेट द्या – SanatanRashtraShankhnad.in