
no images were found
‘सनातन राष्ट्रा’चा जयघोष करत दीड हजार हिंदुत्वनिष्ठ गोव्याकडे रवाना !
कोल्हापूर(प्रतिनिधी ):- मानवजातीच्या परमकल्याणासाठी, तसेच रामराज्याच्या स्थापनेसाठी कार्यरत सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा 83 वा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष या निमित्ताने फोंडा-गोवा येथे 17 ते 19 मे या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. फार्मागुडी, फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर हा महोत्सव होत आहे. या महोत्सवासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून सनातन संस्थेचे दीड हजारपेक्षा अधिक साधक, हिंदू धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी ‘सनातन राष्ट्रा’चा जयघोष करत बसमधून, तसेच विविध वाहनांद्वारे गोव्याकडे प्रयाण केले. या वेळी हिंदुत्वनिष्ठष्ठांनी भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या, तसेच वाहनांवर लावलेल्या भगव्या ध्वजांमुळे वातावरणात चैतन्य पसरले होते.
या प्रसंगी हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. आनंदराव पवळ आणि तालुका संयोजक श्री. अमर जाधव, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कोल्हापूर जिल्हा सहसंयोजक श्री. अभिजित पाटील आणि श्री. अशोक माने, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाचे राज्य संयोजक श्री. पराग फडणीस, शिवशाही प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. सुमील सामंत, अखिल भारतीय हिंदू महासभा जिल्हाध्यक्ष श्री. राजू तोरस्कर आणि जिल्हा उपाध्यक्ष श्री. विकास जाधव, वीर शिवा काशीद यांचे तेरावे वंशज श्री. आनंदराव काशीद, राष्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष पंढरीनाथ ठाणेकर आणि जिल्हा संयोजक श्री. दत्तात्रय पाटील, कांतीभाई पटेल, प्राचार्य रमेश मिरजकर, सर्वश्री आप्पासाहेब गुरव,कैलास दीक्षित, संजय माळी हे मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी श्री. आनंदराव पवळ म्हणाले, ‘या महोत्सवासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून दीड हजारपेक्षा अधिक साधक आणि हिंदुत्ववादी संघटनांचे प्रमुख, कार्यकर्ते फोंडा, गोवा येथे निघाले आहेत. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा जन्मोत्सव आणि एक कोटी जप असा ‘भूतो न भविष्यती’ असा प्रचंड मोठा शंखनाद होणार आहे. जे या महोत्सवासाठी उपस्थित रहाणार राहू शकणार नाहीत, ते ‘ऑनलाईन’ या सोहळ्याचा लाभ घेऊ शकतात.’’ या कार्यक्रमाची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी, तसेच सोहळा ‘लाईव्ह‘ पहाण्यासाठी SanatanRashtraShankhnad.in संकेतस्थळाला भेट द्या !