
no images were found
नवउद्योजकांना दुबईत उत्पादने निर्यातीसाठी मार्गदर्शन करणार : धनंजय दातार
मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी महाराष्ट्रातील नवउद्योजकांची उत्पादने दुबईसह संयुक्त अरब अमिरातीत निर्यात करण्यासाठी मदतीची तयारी दाखवली आहे. दुबईच्या उंबरठ्यावरुन जागतिक बाजारपेठेत व्यवसाय वाढवण्यास इच्छुक असलेल्यांना मनापासून मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.
सोलापूर येथील आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने नुकतीच धनंजय दातार यांची येथे भेट घेऊन त्यांच्यापुढे सोलापूरच्या शेंगा चटणी, ज्वारीची कडक भाकरी, उत्कृष्ट दर्जाची ज्वारी, तांदूळ व डाळी अशा कृषी उत्पादनांचे सादरीकरण केले. एका बॅग उत्पादकाने नावीन्यपूर्ण पॅकेजिंग सोल्यूशन्सही सादर केली. दातार यांनी या सर्वांच्या गुणवत्तेचे कौतुक केले व काही उत्पादने आपल्या अदील ग्रुप ऑफ सुपर स्टोअर्स समूहातर्फे खरेदी करण्याची तयारी ही दाखवली.
भारतातून दुबईत उत्पादने निर्यात करण्यासाठीची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, कायदेशीर तरतुदी, दर्जा व पॅकेजिंगसंबंधी नियम तसेच व्यवसायाचे विपणन करताना घ्यायची काळजी अशा विविध पैलूंवर दातार यांनी या शिष्टमंडळाला मार्गदर्शन केले. ते म्हणाले, भारतातून आखाती देशांत विशेषतः संयुक्त अरब अमिरातीत होणारी निर्यात मुख्यतः सागरी वाहतुकीद्वारे होते आणि ती स्वस्त असते. मात्र या प्रवासाला साधारणतः २० दिवस लागत असल्याने शेल्फ लाईफ अत्यल्प असलेली नाशवंत उत्पादने विचारात घेऊ नयेत. किमान सहा महिने ते वर्षभर टिकणारी उत्पादने निवडावीत. आम्ही आमच्या सुपर स्टोअर्सच्या साखळीद्वारे आखाती बाजारपेठेत शुद्ध, स्वच्छ व अस्सल उत्पादने पुरवतो. हल्ली सेंद्रीय उत्पादनांवर ग्राहकांचा विशेष भर आहे. उत्पादनांचे पॅकेंजिग सुरक्षित व टॅम्परप्रूफ असावे. आम्ही आमच्या पिकॉक ब्रँडअंतर्गत अलिकडे पौष्टिक खपली गहू सादर केला. त्याला येथील ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्याच धर्तीवर नैसर्गिक, रसायनमुक्त, भेसळमुक्त व आरोग्यदायी कृषिउत्पादने व खाद्यउत्पादने पाठवल्यास उत्पादकांनाही समाधानकारक आर्थिक फायदा मिळेल.”
भेसळ, ग्राहकांचे नुकसान, फसवणूक किंवा अनारोग्यकारक उत्पादनांबाबत आखाती देशांचे धोरण व कायदे कडक असल्याने निर्यातदाराने काटेकोर राहण्याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सूचित केले.
महाराष्ट्रातील उत्पादक व व्यावसायिकांना आगामी काळात प्रगतीच्या, निर्यातीच्या व व्यवसायवाढीच्या मोठ्या संधी असल्याचे सांगताना दातार पुढे म्हणाले की मुंबईजवळ पालघर जिल्ह्यात वाढवण हे आंतरराष्ट्रीय बंदर आकाराला येत आहे. पुढील दहा वर्षांत ते संपूर्ण कार्यान्वित होईल. त्यामुळे महाराष्ट्राला मुंबईजवळ जेएनपीटी व वाढवण अशी दोन मोठी आंतरराष्ट्रीय बंदरे जागतिक निर्यातीसाठी उपलब्ध असतील. महाराष्ट्रात पायाभूत सुविधा झपाट्याने विकसित होत आहेत. समृद्धी महामार्गाने विदर्भाला मुंबईशी जोडले आहे. अशा प्रस्तावित महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा फायदा वेळेत उठवण्यासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे. ज्यांना उत्तम व यशस्वी उद्योजक तथा निर्यातदार बनायचे असेल त्यांनी आतापासूनच आयात-निर्यात व्यवहारांची माहिती घ्यावी, शक्य असल्यास त्याचा अभ्यासक्रम शिकावा आणि उद्योग उभारुन दोन-तीन वर्षांत निर्यात सुरू करावी म्हणजे अजुन दहा वर्षांनी विकसित महाराष्ट्राच्या प्रगतीत तेही सुस्थापित बनून योगदान देऊ शकतील. महाराष्ट्रात अनेक गरीब, मेहनती व होतकरु तरुण उद्योजकतेची, समृद्धीची स्वप्ने बघत आहेत आणि त्यांच्यातून हजारो उद्योजक निर्माण व्हावेत, हे माझे स्वप्न आहे. मी गेली ३० वर्षे दुबईत मराठी संस्कृती व उद्यमाच्या प्रसारासाठी कार्यरत आहे. त्यामुळे सोलापूरप्रमाणेच महाराष्ट्रातील अन्य शहरांतील तरुणांनीही नावीन्यपूर्ण उत्पादने व कल्पनांसह पुढे यावे. त्यांना मी जरुर मार्गदर्शन करेन.”
या शिष्टमंडळात आमदार देशमुख यांच्याखेरीज सोलापूर गार्मेन्ट्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे संचालक अमित जैन, उद्यम पीएएचएसयूआय फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश गुराणी, अल्पेश संकलेचा, विजय पाटील, यश जैन, प्रदीप जैन, आनंद झाड आणि चंद्रशेखर जाधव आदींचा समावेश होता.