
no images were found
‘उफ्फ ये लव है मुश्किल …’ या कौटुंबिक रॉम-कॉममधल्या आपल्या वकीलाच्या भूमिकेसाठी आशी सिंह रात्र-रात्र कोर्टरूम ड्रामा बघत आहे
विनोद, रोमान्स आणि कौटुंबिक नाट्य यांचे मिश्रण असलेली ‘उफ्फ ये लव है मुश्किल …’ ही मालिका त्यातील वेधक कथानकाने प्रेक्षकांचे लक्ष नक्कीच वेधून घेईल. या मालिकेच्या केंद्रस्थानी आहे कैरी शर्मा, जिची भूमिका आशी सिंह करत आहे. कैरी शर्मा एक महत्त्वाकांक्षी आणि होतकरू तरुण वकील आहे. युग (शब्बीर अहलूवालिया) तिच्या आयुष्यात येतो तेव्हा तिच्या जीवनात उलथापालथ होते. स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडणाऱ्या, होतकरू वकीलाची भूमिका आशीने खूप गंभीरतेने घेतली आहे. तिचे चित्रण अस्सल वाटावे यासाठी कायदेविषयक शोज तिने बारकाईने पाहिले. क्लासिक कोर्टरूम शोजपासून कोरियन-कोर्टरूम ड्रामापर्यंत तिने सर्व काही पाहिले आहे.
आपल्या व्यक्तिरेखेत अस्सलता आणण्यासाठी सर्व प्रयत्न करत असलेली आशी सिंह म्हणते, “कायद्याची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी मी खटल्यापासून सुरुवात केली आणि कायदा आणि व्यवस्था यांचा सखोल अभ्यास केला. पण सगळ्यात अनपेक्षित प्रेरणा मला मिळाली ती कोरियन ड्रामा विन्सेन्झो मधून! तो सर्वसामान्य कोर्टरूम ड्रामा नाहीये. त्यातील दोन्ही प्रमुख पात्रे वकील आहेत. वकीलाचा आत्मविश्वास आणि भावनिक संवेदनशीलता यांच्यातील समतोल कसा साधावा हे समजून घेण्यासाठी मला याचा खूप उपयोग झाला. शिवाय, त्या दोघांमधील ‘नोक-झोक’ मला बरीचशी या मालिकेटल्या कैरी आणि युगच्या नात्यासारखीच वाटली.”
या संदर्भांचा चांगलाच उपयोग झाला असावा, कारण अलीकडे प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये एका वकीलाच्या रूपात आशीचा परफॉर्मन्स चांगलाच खणखणीत आहे आणि तितकाच मोहक देखील! तिचा पवित्रा, तिचे टायमिंग, युक्तिवाद करण्याची पद्धत हे सारे सहज आणि स्वाभाविक वाटते आहे.
आशी म्हणते, “मला दमदार व्यक्तिरेखा करायला आवडतात. पण कैरी जरा वेगळी आहे. तिच्यात आग आहे, ती हुशार आहे पण ती हृदयाचा कौल घेते. मला माहीत होते की वरवर आत्मविश्वास दाखवून मी ही भूमिका करू शकणार नाही. अनेक कायद्यावर आधारित शोज पाहून मी कोर्टरूमचे वातावरण, तेथील हालचाली बारकाईने पाहिल्या. ‘अजून एक एपिसोड’ असे म्हणत म्हणत मी रात्री 2 वाजेपर्यंत जागत होते. पण त्यामुळे मी कायदेशीर शब्दावलीच्या पलीकडे जाऊ शकले. कैरीसारखे अस्सल, स्वभावात विविध कंगोरे असलेले आणि गुण-दोषांनी युक्त असे पात्र कसे असू शकते हे मला समजू शकले. प्रेक्षक तिला कधी भेटतात आणि मी माझ्या कुवतीने तिचे व्यक्तित्व उभे केले आहे, त्याबद्दल ते काय प्रतिक्रिया देतात हे जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे.”