
no images were found
करवीर पीठतर्फे मान्यवरांचा सत्कार
कोल्हापूर, (प्रतिनिधी):– तत्त्वज्ञानाला उजाळा देण्याचा जयंतीतून प्रयत्न केला जातो. त्यामुळेच आद्य शंकराचार्यांची जयंती उत्सव केला जातो, असे मत स्वामी विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी व्यक्त केले.
श्रीमद जगद्गुरू आद्य शंकराचार्यांच्या २५३३ व्या जयंती उत्सवा निमित्ताने पीठामध्ये आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यामध्ये पीठाचा महत्त्वाचा कार्यक्रम असणारा पुरस्कार वितरण आज स्वामीजींच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
स्वामीजी म्हणाले, फूल नाही, पाकळी नाही सुगंधाचा वर्षाव करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून होत आहे. ज्याप्रमाणे दरवर्षी वाढदिवस केला जातो त्याप्रमाणे जयंती करण्याचा उद्देश स्पष्ट करण्याबरोबर प्रत्येकाने धर्मचारण करणे जरुरीचे असल्याचे स्वामीजीना सांगितले.
यावेळी यामध्ये वैदिक पुरस्कार ईश्वर घनपाठी (वाराणसी), सांस्कृतिक पुरस्कार दोर्बल शर्मा (हैदराबाद), कीर्तनकार पुरस्कार राघवेंद्र देशपांडे (धाराशीव), स्थानिक वैदिक पुरस्कार प्रसाद निगुडकर (कोल्हापूर), सामाजिक गौरव प्रकाश आनंदराव गवंडी (कोल्हापूर), महिला कीर्तनकार पुरस्कार मानसी बडवे (पुणे), होतकरू विद्यार्थी पुरस्कार यज्ञनंदन कस्तुरे (जालना), वेदार्थ जोशी (चिंचवड), उत्कृष्ट शासकीय कर्मचारी पुरस्कार सौ. वैभवी अभय दाबके (मुंबई) यांचा स्वामीजींच्या हस्ते गौरव करण्यात आला.
सदस्य प्रसाद चिकसकर, रामकृष्ण देशपांडे, धनंजय मालू, प्रसन्न मालेकर यांच्यासह मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते. कार्यवाह शिवस्वरूप भेंडे यांनी स्वागत केले. प्रमोदशास्त्री कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले, तर अध्यक्ष सुरेश कुलकर्णी यांनी आभार मानले.