
no images were found
शंकराचार्य पीठाचे पुरस्कार वितरण रविवारी,मान्यवरांचा होणार स्वामींच्या हस्ते गौरव
कोल्हापूर, (प्रतिनिधी):– येथील शंकराचार्य पीठाचे पुरस्कार वितरण उद्या (ता. ११) होईल. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते होईल.
श्रीमद जगद्गुरू आद्य शंकराचार्यांच्या २५३३ व्या जयंती उत्सवा निमित्ताने पीठामध्ये आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पीठाचा महत्त्वाचा कार्यक्रम असणारा पुरस्कार वितरण उद्या होईल. यामध्ये वैदिक पुरस्कार ईश्वर घनपाठी (वाराणसी), सांस्कृतिक पुरस्कार दोर्बल शर्मा (हैदराबाद), कीर्तनकार पुरस्कार राघवेंद्र देशपांडे (धाराशीव), स्थानिक वैदिक पुरस्कार प्रसाद निगुडकर (कोल्हापूर), सामाजिक गौरव प्रकाश आनंदराव गवंडी (कोल्हापूर), डॉ. साळवे (पुणे), महिला कीर्तनकार पुरस्कार मानसी बडवे (पुणे), होतकरू विद्यार्थी पुरस्कार यज्ञनंदन कस्तुरे (जालना), वेदार्थ जोशी (चिंचवड), उत्कृष्ट शासकीय कर्मचारी पुरस्कार सौ. वैभवी अभय दाबके (मुंबई) असे मानकरी आहेत. पीठामध्ये सकाळी दहा वाजता पुरस्काराचे वितरण होईल. यावेळी गुरुवर्य संभाजी भिडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, सकाळी सात वाजता देवतांना दत्तात्रय जोशी यांच्या हस्ते अभिषेक, आठ वाजता श्रीराम शैव यांचे दशोपनिषद वाचन, रामचंद्र टाकळकर यांचे गीताभाष्य, ब्रह्मसूत्रभाष्य प्रमोदशास्त्री कुलकर्णी यांच्याबरोबर हवन राजेश्वर शास्त्री यांच्या निर्देशनाखाली अनिरुद्ध जोशी यांनी केला. प्रमोदशास्त्री कुलकर्णी यांचे पारायण यामध्ये रामायण सायंकाळी पाच वाजता झाले. या सर्व कार्यक्रमांचे नियोजन कार्यवाह शिवस्वरूप भेंडे यांनी केले. उद्या होणाऱ्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाला भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. भेंडे यांनी केले आहे.