no images were found
CNG-PNG दराबाबत सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली: वाढत्या महागाईने हैराण झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. पीएम नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या बैठकीत नैसर्गिक वायूच्या किमती निश्चित करण्याच्या नव्या सूत्राला मंजुरी देण्यात आली आहे.मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या नवीन फॉर्म्युल्यानुसार, घरगुती नैसर्गिक वायूची किंमत आता भारतीय क्रूड बास्केटच्या किंमतीच्या आधारावर निश्चित केली जाईल. या निर्णयामुळे येत्या दोन दिवसांत म्हणजेच शनिवारपासून सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी होतील. PNG ची किंमत ५ रुपये कमी होईल, तर सीएनजीच्या किंमती सुमारे ८ रुपयांनी कमी होतील.
आतापर्यंत सरकार दर सहा महिन्यांनी म्हणजे १ एप्रिल आणि १ ऑक्टोबरला नैसर्गिक वायूच्या किमती ठरवायची. मात्र, आता नवीन फॉर्म्युल्यानुसार सीएनजी-पीएनजीच्या किमती दर महिन्याला निश्चित केल्या जातील.याशिवाय, नवीन सूत्रानुसार गेल्या एक महिन्यातील भारतीय क्रूड बास्केटची किंमत घरगुती नैसर्गिक वायूच्या किमतीचा आधार म्हणून घेतली जाईल. तत्पूर्वी, जुन्या सूत्रानुसार जगातील चारही गॅस ट्रेडिंग केंद्रांच्या मागील एका वर्षाच्या किंमतीची सरासरी घेतली जात होती आणि नंतर ती तीन महिन्यांच्या अंतराने लागू केली जात होती.
नवीन फॉर्म्युला लागू झाल्यानंतर पीएनजी आणि सीएनजी स्वस्त होणार असल्याचा सरकारचा दावा आहे. यामुळे घरगुती ग्राहकांना अधिक स्थिर दराने गॅस मिळेल. याशिवाय खते बनवणाऱ्या कंपन्यांना स्वस्तात गॅस मिळणार असून, त्यामुळे खतावरील अनुदान कमी होणार आहे. नवीन फॉर्म्युला लागू झाल्याने ऊर्जा क्षेत्राला स्वस्त गॅस मिळणार आहे.