
no images were found
श्रीक्षेत्र जोतिबा व अंबाबाई मंदिर विकास आराखडा अंतिम करताना भाविकांच्या सोयी सुविधांना प्राधान्य द्या
– माधुरी मिसाळ
कोल्हापूर, : श्रीक्षेत्र ज्योतिबा व अंबाबाई मंदिर विकास आराखडा अंतिम करताना भाविकांच्या सोयी सुविधांना प्राधान्य द्या, असे निर्देश नगर विकास, सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याच्या सह-पालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.
श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखडा व श्री क्षेत्र जोतिबा मंदिर व परिसर विकास आराखड्याबाबत सह पालकमंत्री श्रीमती मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार अमल महाडिक, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले व चंद्रकांत आयरेकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सह पालकमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, श्रीक्षेत्र जोतिबा मंदिर व परिसर विकास आराखडा तयार करताना येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयीचा विचार करा. या परिसरात फूड प्लाझा करा. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर नारळ फोडण्यात येतात, याचा विचार करुन नारळ फोडण्यासाठी जागा, अगरबत्ती कापूर लावण्याची जागा याचेही नियोजन आराखड्यात करा. या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी विचारात घेऊन स्वच्छतागृहांची संख्या वाढवा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याअंतर्गत या मंदिराचे संवर्धन व दुरुस्तीची कामे पहिल्या टप्प्यात मार्गी लावण्यासाठीचा प्रस्ताव तात्काळ सादर करा. या परिसरातील विकास कामे करताना नागरिकांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्या. परिसरात पार्किंग व्यवस्था, स्वच्छतगृहे, फेरीवाले, दुकानदार यांचा विचार करुनच नवीन आराखडा अंतिम करा.
श्री क्षेत्र जोतिबा मंदिर व परिसर विकास आराखडा 1804.89 कोटींचा तयार करण्यात आला आहे. आराखड्यातील पहिल्या टप्प्यात 259.59 कोटींचा आराखडा सुरुवातीला सादर करण्यात आला होता. यात आवश्यक कामांचा समावेश करुन पाठवण्यात आलेला 272.43 कोटींचा आराखडा वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्याकडे मंजूर झाला आहे. मुख्य सचिव सुजाता सैनिक यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी बैठक होऊन जोतिबा मंदिराच्या संवर्धनाशी संबंधित कामांना मान्यता देण्यात आली असून त्यातील आवश्यकत त्या बदलासह आराखडा शिखर समितीकडे पाठवण्यात येईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता तुषार तोंदले व देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली. तसेच श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्याबाबतही मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 1445.97 कोटींचा आराखडा सादर करण्यात आल्याचे श्री. तोंदले व श्री. नाईकवाडे यांनी सांगितले.