
no images were found
काँग्रेस अध्यक्षपदासाठी आज मतदान, थरुर की खरगे?
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान सुरु आहे. मतदानासाठी देशभरातील ४० केंद्रांवर ६८ बूथ स्थापन करण्यात आले आहेत. राज्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन येथे निवडणूक मतदानाची प्रक्रिया पार पडेल.
शशी थरुर आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यापैकी एकाची ९८०० मतदार निवड करतील. या निवडणुकीत भारत जोडो यात्रेच्या शिबिरात एक बूथ तयार करण्यात आला असून तेथे राहुल गांधी आणि सुमारे ४० मतदार मतदान करणार आहेत.
काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात 19 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल आणि निकाल घोषित केले जातील. काँग्रेस अध्यक्षपदासाठी तब्बल २२ वर्षांनंतर निवडणूक होत असून तब्बल २४ वर्षांनंतर पक्षाची धुरा गांधी घराण्याबाहेर जाणार आहे.मतदारांनी मतदानपत्रिकेवरील उमेदवाराच्या नावापुढे मतदान करताना एक क्रमांक टाकावा, असे आधी ठरले होते. मात्र, या मतदानपत्रिकेवरील अनुक्रमानुसार पहिल्या क्रमांकावर मल्लिकार्जुन खर्गे व दुसऱ्या क्रमांकावर शशी थरूर यांचे नाव आहे. जर पसंतीच्या उमेदवाराच्या नावापुढे क्रमांक टाकून मतदान केल्यास गोंधळात भर पडेल व दोन क्रमांकावरील थरूर यांना फटका बसू शकतो, अशी शक्यता थरूर गटाने व्यक्त केली होती.
काँग्रेस पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदारांनी उमेदवारांच्या नावापुढे पसंतीची खूण करावी, असे आवाहन काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने केले आहे. पक्षाध्यक्षपदाचे उमेदवार शशी थरूर यांच्या गटाने आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी हा निर्णय जाहीर केला.