
no images were found
आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिभेचा भरतनाट्यम नृत्याविष्कार कार्यक्रमाचे आयोजन
कोल्हापूर (प्रतिनिधी):- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे स्वातंत्र्य संग्रामातील एक धगधगते अग्निकुंडच! स्वतःच्या आयुष्याची, घरादाराची, संसाराची होळी करून संपूर्ण भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अखंड झिजणारे एक क्रांतिपर्व. याबरोबरच संस्कृत भाषाप्रभू, प्रज्ञावंत लेखक, नाटककार, इतिहासकार, अद्वितीय राजनितीज्ञ, लोकोत्तर द्रष्टा, अफाट कल्पनांचा जनक, असं बहुविध प्रज्ञा लाभलेलं हे व्यक्तीमत्व. स्वतः सावरकरांनाही भावणारा त्यांचा स्वतःचा एक गुण म्हणजे त्यांचं कवित्व. स्फूर्तीगीते, नाट्यगीते, महाकाव्ये, खंडकाव्ये त्याचबरोबर लावणी, गजल, फटका अशी सर्व प्रकारची अजरामर गीते लिहीणारे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे व्यक्तिमत्त्व एकमेवाद्वितीय. अशा महाकवी सावरकरांचे कवित्व नृत्यातून लोकांसमोर मांडावे हा विचार मिरजेच्या ‘नृत्यश्री ‘ संस्थेच्या संस्थापक संचालिका आणि सुप्रसिद्ध भरतनाट्यम नर्तिका सौ धनश्री आपटे यांनी केला. याविचारावर कठोर परिश्रम घेऊन त्यांनी ”तेजोमय तेजोनिधी’ हा सावरकरांना मानवंदना देणारा कार्यक्रम साकार केला आहे.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समिती’ दादर, ‘कलांगण’ मुंबई आणि ‘नृत्यश्री’ मिरज या तीन संस्थांच्या सहयोगाने आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशन, सकल हिंदू समाज कोल्हापूर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी यांच्या वतीने ‘तेजोमय तेजोनिधी’ हा कार्यक्रम येत्या गुरुवारी १ मे रोजी कोल्हापूरातील प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर संध्याकाळी ७ वाजता सादर होणार आहे.
सौ.धनश्री आपटे यांच्या शिष्या सावरकरांच्या प्रचलित आणि अप्रचलीत गीतांवर आधारीत नृत्यांजली अर्पण करतील. अप्रचलीत गीतांना स्वरबद्ध केले आहे ‘कलांगण’ मुंबईच्या संचालिका विख्यात गायिका सौ वर्षा भावे यांनी. आणि सावरकरांच्या या गीतांजली कार्यक्रमाचे निवेदन करण्यासाठी, सावरकरांच्या प्रतिभेचा, प्रखर राष्ट्रभक्तीचा आलेख आपल्यासमोर मांडण्यासाठी उपस्थित असतील सावरकरांचे अभ्यासक , अभिनेते श्री शरद पोंक्षे..! या नृत्याविष्काराचा शुभारंभ २०११ साली अंदमानच्या पुण्यभूमीत झाला. यांचे प्रयोग नंतर पुणे, मुंबई, नाशिक, अमरावती, सोलापूर, अक्कलकोट , मिरज सांगली,बेळगाव आदी शहरांमध्ये झाले आहेत आणि त्याला प्रेक्षकांची/ रसिकांची, सावरकरप्रेमींची भरभरून दादही मिळाली आहे. प्रा.प्र.ल.गावडे, प्रा.डॉ.गो.ब.देगलूरकर, ज्येष्ठ प्रवचनकार सु.ग.शेवडे , डॉ.कल्याणी नामजोशी, डॉ.जयराम पोतदार, कॅप्टन निलेश गायकवाड, श्री राहूल घोरपडे, ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ तबलावादक पं भाई गायतोंडे, तालयोगी पं. सुरेशदादा तळवलकर, प्रसिद्ध संगीतकार श्री श्रीधर फडके, विख्यात गायिका श्रीमती आशाताई खाडिलकर, श्री माधव खाडिलकर, ज्येष्ठ नर्तिका डॉ सुचेताताई चाफेकर, स्वातीताई दैठणकर, सोनिया परचुरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी हा कार्यक्रम गौरविला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे काव्य आणि त्यांचे विचार जास्तीत जास्त समाजघटकांपर्यंत पोहोचविणे हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
कोल्हापूरला हा कार्यक्रम करण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनने पुढाकार घेतला आहे. या कार्यक्रमात धनश्री आपटे यांच्या शिष्या चैत्राली आठवले, सायली कुलकर्णी, ऐश्वर्या सासनूर, जुई कुलकर्णी, वैष्णवी शेट्ये, सायली रायबागकर, प्रचिती सौदागर, आणि मुक्ता निलाखे या सादरीकरण करणार आहेत. तमाम कोल्हापूरकर आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद देतील याची खात्री आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. कोणत्याही स्वरूपाचीचे तिकिट यासाठी आकारण्यात येणार नाही. तरी या कार्यक्रमास तमाम कोल्हापूरकर, सावरकर प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करणेत येत आहे.
या पत्रकार परिषदेस विश्व हिंदू परिषदेचे श्रीकांत पोतनीस, संतोष पंडित, नितीन वाडीकर, सतीश आंबर्डेकर, संदीप गुळवणी, एस.के.कुलकर्णी, श्रीमती शालनताई शेटे आदी उपस्थित होते.