
no images were found
प्रेयसीचे लग्न ठरल्याने तरुणाची आत्महत्या
पुणे : प्रेयसीचे लग्न ठरल्याने नैराश्यातून एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. साकिब लतीफ इनामदार (वय २५) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. तुझं आता दुसऱ्याशी लग्न जमलं आहे, तर मग मी जगून काय करू, असं म्हणत तरुणाने प्रेयसीच्याच ओढणीने गळफास घेत जीवन संपवल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
साकिब त्या तरुणीचे गेल्या तीन वर्षापासून प्रेमसंबंध होते. मात्र आता काही दिवसांतच प्रेयसीचा विवाह दुसऱ्यासोबत होणार होता. यावरून प्रियकर आणि प्रेयसीमध्ये वाद सुरू होते. यावरच बोलण्यासाठी ते रविवारी सकाळी सिंहगड पायथ्याशी असलेल्या गोळेवाडी येथील किनारा लॉजवर भेटले. प्रेयसी दुसऱ्या धर्माची असून तिचे लग्न दुसरीकडे होणार होते. यावर चर्चा सुरू असताना दोघांमध्ये शाब्दिक वाद विकोपाला गेले आणि त्यांच्यात जोरदार वादावादी झाली. त्यानंतर प्रियकर साकीब याने तुझे लग्न आता दुसऱ्याशी होणार आहे मी जगून तरी काय करू? असे म्हणत रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास प्रेयसी समोरच तिच्याच ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली.
दरम्यान, साकिब इनामदार हा पिंपरी भागात राहणारा होता. त्याची प्रेयसी देखील त्याच भागात राहत होती. काही दिवसांपासून प्रेयसीचे लग्न जमल्याने साकिब तणावात होता. यावरच तोडगा काढण्यासाठी ते दोघेही सिंहगड पायथ्याशी भेटले होते. मात्र या लव्ह स्टोरीचा अंत इतका हृदय पिळवटून टाकणारा झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.