
no images were found
‘बस इतना सा ख्वाब’ चा निरोप: राजश्री ठाकूर आणि योगेंद्र विक्रम सिंग यांनी प्रेक्षकांचे मानले आभार!
हृदयस्पर्शी कथा आणि प्रेरणादायक कथानकासह प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी झी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘बस इतना सा ख्वाब’ आता 13 एप्रिल 2025 रोजी आपला शेवटचा भाग प्रसारित करणार आहे. अवनी त्रिवेदी (राजश्री ठाकूर) या कानपूरच्या एका गृहिणीचा प्रवास दाखवणाऱ्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले – एक अशी स्त्री जी समाजाच्या अपेक्षांपलीकडे जाऊन आपल्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या खऱ्या क्षमतेचा शोध घेते.
राजश्री ठाकूर, योगेंद्र विक्रम सिंग, भूमिका गुरूंग, छवी पांडे आणि ईशा धीरवानी यांसारख्या कलाकारांनी साकारलेल्या विश्वसनीय पात्रांनी आणि प्रभावी कथाकथनाने या मालिकेने प्रेक्षकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवले. ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच संपत आहे, जिथे प्रेक्षकांना कौटुंबिक पुनर्मिलन पाहायला मिळते आणि तमन्नाला अखेर अटक होते.
अवनीची भूमिका सुंदर साकारणारी राजश्री ठाकूर भावुक होत म्हणाली, “बस इतना सा ख्वाब’ या मालिकेचा भाग होणे हा माझ्यासाठी एक अद्भुत अनुभव ठरला. मला आनंद आहे की ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असताना आणि आम्हांला जसा शेवट हवा होता तसा होतोय. अवनीचे पात्र साकारणे हे माझ्या कारकिर्दीतील सर्वात परिपूर्ण अनुभवांपैकी एक ठरले – मी तिच्या प्रवासात पूर्णतः झोकून दिले आणि प्रेक्षकांनी जे प्रेम दिले त्यासाठी मी फारच आभारी आहे. ही केवळ एक मालिका नव्हती, तर ती चिकाटी, प्रेमाची आणि आत्मशोधाची कहाणी होती आणि तिचा भाग होणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. झी टीव्ही, आमचे निर्माते, पडद्यामागील संपूर्ण टीम आणि विशेषतः आमचे प्रेक्षक – जे प्रत्येक वळणावर आमच्या सोबत राहिले – त्यांचे मन:पूर्वक आभार मानते. ही निरोपाची वेळ कडू-गोड आठवणींनी भरलेली आहे, पण मला खात्री आहे की आम्ही आमचे काम पूर्णपणे केले आहे.”
शिखरचे अनेक स्तर असलेले पात्र साकारणारा योगेंद्र विक्रम सिंग आभार मानत म्हणाला, “हा शो माझ्यासाठी चढ-उतारांनी भरलेला प्रवास ठरला आणि शिखरच्या पात्रातील प्रत्येक क्षण मला प्रिय होता. त्यातील खोल भावनात्मक प्रसंग असो किंवा सेटवरील हलकीफुलकी मस्ती – ‘बस इतना सा ख्वाब’ ने मला आयुष्यभर पुरतील अशा आठवणी दिल्या आहेत. निर्मात्यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून हे पात्र मला दिले, आणि माझ्या अभिनयात काहीतरी नवीन प्रयोग करण्याचे स्वातंत्र्य दिले. सेटवरील आमचे नाते इतके घट्ट झाले की सहकलाकार कुटुंबासारखे वाटू लागले, आणि हे नाते आम्ही पुढेही जपणार आहोत. आणि सगळ्यांत महत्त्वाचे – प्रेक्षकांचे आभार! त्यांचे प्रेम आणि पाठिंबा आमच्यासाठी सगळ्यात मोठी ताकद होती. त्यांच्याशिवाय शिखरचे पात्र आणि आमचा हा संपूर्ण प्रवास शक्यच नव्हता.”
‘बस इतना सा ख्वाब’चा शेवट संपूर्ण कलाकार आणि तंत्रज्ञांसाठी अत्यंत भावनिक ठरतोय. जरी हा प्रवास संपत असला तरी या मालिकेची कथा आणि तिचा प्रभाव तिच्या निष्ठावान चाहत्यांच्या हृदयात कायम जिवंत राहील.