
no images were found
विमान संरक्षण विधेयकामुळे विमान वाहतूक कंपन्या आणि प्रवासी यांना सुरक्षा आणि कायदेशीर पाठबळ मिळणार,- धनंजय महाडिक
शुक्रवारी राज्यसभेत खासदार धनंजय महाडिक यांनी भारताच्या विमान संरक्षण विधेयकाबाबतच्या चर्चेमध्ये सहभाग घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचा संकल्प केला आहे. त्या दृष्टीने हे विधेयक हे महत्वाचे पाऊल असल्याचे खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले. २०१४ मध्ये भारतात ७४ विमानतळ होते आणि २०९ मार्गांवर विमानसेवा सुरू होती. २०२४ मध्ये भारतातील विमानतळाची संख्या १४९ झाली असून, तब्बल ९०० मार्गांवर विमान प्रवासी वाहतूक सेवा सुरू आहे. २०१४ मध्ये देशातील साडेआठ कोटी नागरिक विमान प्रवास करायचे. हीच संख्या आता १६ कोटी पेक्षा अधिक झाली आहे. सध्या भारतात साडेसात हजारपेक्षा अधिक विमान प्रवासी सेवा देत आहेत. तर लवकरच नवी १ हजार विमाने भारतीय प्रवाशांना सेवा देण्यासाठी येणार आहेत. नवतंत्रज्ञान, जलद आणि सुरक्षित सेवा यामुळे भारतात विमान व्यवसाय, पायाभूत सुविधा आणि प्रवाशांची संख्या वाढत असल्याचे खासदार महाडिक यांनी नमुद केले. दरम्यान महाराष्ट्रातील विमानसेवा अधिक विस्तारीत करावी. कोल्हापूरहून नागपूर, गोवा, सुरत, शिर्डी या मार्गावर विमानसेवा सुरू व्हावी, त्यातून महाराष्ट्राच्या उद्योग, पर्यटन आणि कृषी विभागाला मोठा फायदा होईल, अशी मागणी खासदार महाडिक यांनी राज्यसभेत केली. मुंबई-नाशिक, सोलापूर-मुंबई, पुणे ते बेळगाव, औरंगाबाद-इंदूर, नाशिक-जयपूर, पुणे-हुबळी या मार्गावरही नवी विमानसेवा सुरू व्हावी, अशी अपेक्षा खासदार महाडिक यांनी बोलून दाखवली.
१५ वर्षापूर्वी विमान प्रवास करणे स्वप्न असायचे आणि कोणत्या ना कोणत्या ट्रॅव्हल एजंटमार्फत विमानाचे तिकीट काढावे लागायचे. मात्र आता नव्या आणि सोप्या तंत्रज्ञानामुळे घरबसल्या कुणीही विमानाचे तिकीट आरक्षित करू शकतो. इतकेच नव्हे तर विमानातील भोजन आणि अन्य सुविधांची निवड करू शकतो. त्यामुळेच भारतातील सर्व विमानतळ गर्दीने व्यापलेली दिसत आहेत, असे खासदार महाडिक यांनी बोलून दाखवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या उडान योजनेमुळे छोटी शहरं मोठया शहरांना जोडली गेली आहेत. त्यामुळे भारतीय विमान उद्योग आज जगभरातील सर्वात गतीने विकसित होणारे क्षेत्र बनले आहे. अशावेळी या विधेयकामुळे भारतीय विमान उद्योगाला अधिक गती आणि सुरक्षा मिळेल. तसेच विविध विमान, वाहतूक कंपन्या आणि प्रवासी यांनाही त्यांचे हक्क, अधिकार याबाबत पारदर्शकता आणि स्पष्टता येईल. तसेच विमानातील विविध उपकरणांबद्दल अधिक सुरक्षेची जबाबदारी निश्चित होईल, असे खासदार धनंजय महाडिक यांनी नमुद केले. या नव्या विधेयकामुळे भारतातील विमान कंपन्या अधिक आत्मविश्वासाने काम करतील आणि त्याचा लाभ प्रवाशांना होईल, असे खासदार महाडिक यांनी नमुद केले.