no images were found
कोल्हापूर-सांगली महामार्गाची चाळण; स्वाभिमानीकडून ठेकेदार, प्रकल्प संचालकांचा पुतळा दहन
कोल्हापूर : कोल्हापूर ते सांगली महामार्गावर शिरोली फाटा ते अंकली फाट्यापर्यंत अक्षरश: चाळण झाली आहे. या निकृष्ठ कामाच्या निषेधार्थ आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून चोकाकमध्ये (ता. हातकंणगले) येथे ठेकेदार व राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक पंढरकर यांनी मी जनतेला उत्तर देण्यास बांधिल नाही, आपण लेखी तक्रार करा मगच मी कारवाई करतो असे उध्दट बोलल्याबद्दल उजळाईवाडी येथील कार्यालयात अधिकाऱ्यांशी वाद झाला होता. त्यामुळे स्वाभिमानीकडून रास्ता रोको व पुतळा दहन आंदोलनाची घोषणा केल्यानंतर एका रात्रीत या महामार्गावरील रूकडी, अतिग्रे, चोकाक , हेर्ले या भागातील खड्डे मुजविण्यासाठी यंत्रणा गतिमान झाली.
सांगली कोल्हापूर महामार्ग काही महिन्यापूर्वी राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. जून महिन्यात या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी ८ कोटी रूपये मंजूर करण्यात आले गेल्या चार महिन्यापासून ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे रस्त्याची चाळण झाली आहे. अनेक अपघात होवून यामध्ये अनेक प्रवाशी जखमी व मृत झाले आहेत. हातकंणगले पोलिस ठाण्याच्या दोन महिला पोलिस कर्मचारी सुध्दा या रस्त्यातील खड्यात अपघात होवून जखमी झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशी व वाहतूकदार या मार्गावर वाहतूक करत असताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
स्वाभिमानीकडून गुरूवारपर्यंत रस्ता दुरूस्त न झाल्यास हातकंणगले येथे दिवसभर सांगली कोल्हापूर महामार्ग चक्काजाम करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी सदर रस्ता मुदतीत पुर्ण करण्याचे व संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, संदीप कारंडे, संतोष जाधव, राजेश पाटील, सागर मादनाईक, ॲड. सुधीर पाटील, ॲड. सुरेश पाटील, सुजित जाधव, मुनीर जमादार, संपत पवार, अण्णा मगदूम यांचेसह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.