
no images were found
नक्षलवादी नेत्याच्या पत्रातून सत्य उघड;
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी अलीकडेच घोषणा केली की,३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवादाचा भारतातून समूळ नायनाट करण्यात येईल. नक्षलवाद हा देशाच्या विकासासाठी मोठा अडथळा आहे, असे मानणाऱ्या शहा यांनी आपल्या दूरदृष्टी आणि उत्कृष्ट प्रशासकीय कौशल्याच्या जोरावर भारताला टप्प्यावर आणले आहे जिथे नक्षलमुक्त भारताचे स्वप्न प्रत्यक्ष साकार होत आहे.
सर्वांना ठाऊक आहे कि गेल्या अनेक दशकांपासून, मतांच्या राजकारणामुळे आणि तुष्टीकरणाच्या धोरणांमुळे नक्षलवाद आणि दहशतवाद वाढू दिला गेला. याउलट, मोदी सरकारने नक्षल चळवळीला चांगलीच पाचर मारत देशाला शांतता आणि विकासाच्या दिशेने नेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि अमित शहा यांच्या रणनीतीमुळे सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरुद्ध सातत्याने मोहीमा राबवल्या असून त्यांच्या संघटनांना मोठा फटका बसला आहे.
या मोहिमेअंतर्गत, बीजापूरमधील एका चकमकीदरम्यान सुरक्षा दलांना एका नक्षलवादी नेत्याने लिहिलेले पत्र सापडले. या पत्रातून असे स्पष्ट होते की नक्षलवादी प्रचंड भीतीच्या वातावरणात आहेत. देशात आपल्यासाठी कुठेही सुरक्षित आश्रयस्थान उरलेले नाही, असा उल्लेख त्या पत्रात आहे. अमित शहा यांच्या नक्षलवादविरोधी कठोर भूमिकेमुळे नक्षली नेत्यांमध्ये खळबळ माजली असून, उरलेले नक्षल नियंत्रित प्रदेश भीतीच्या सावटाखाली आहेत.
नक्षलवादी नेता मोटूने आपल्या महिला नक्षल कमांडर मंकीला लिहिलेल्या या पत्रात स्पष्ट उल्लेख आहे की सुरक्षा दलांचे सातत्याने नक्षलवादविरोधी मोहीमा सुरू असल्याने बोडका, गंपूर, दोडितुमनार आणि तोंडका ही ठिकाणे आता सुरक्षित राहिली नाहीत. नक्षलवाद्यांना लपण्यासाठी ठिकाणे मिळेनाशी झाली आहेत.
नक्षलवाद नष्ट करण्यासाठी शहा यांनी आखलेल्या अचूक धोरणांमुळे नक्षली गट केवळ कमकुवतच झाले नाहीत, तर आता ते पळायचा व आत्मसमर्पण करण्याच्या भूमिकेत आले आहेत. अमित शहा यांच्या रणनीतिक नेतृत्वामुळे आणि पंतप्रधान मोदी यांच्या दृष्टीकोनामुळे आता प्रत्यक्ष परिणाम दिसू लागले आहेत. छत्तीसगडमधील गरियाबंद, अबुझमाड, बस्तर आणि बीजापूर या भागांमध्ये सातत्याने सुरू असलेल्या मोहिमांमुळे शेकडो नक्षलवादी ठार झाले आहेत. गेल्या वर्षभरातच ३८० नक्षलवादी मारले गेले, १,१९४ जणांना अटक करण्यात आली, तर १,०४५ जणांनी शरणागती पत्करली. यामुळे एकूण २,६१९ नक्षलवादी कमी झाले आहेत.
नक्षलवादाविरोधात आक्रमक भूमिका घेत असताना, अमित शहा यांनी नक्षल प्रभावित भागातील आदिवासी समाजाच्या विकासावर आणि सशक्तीकरणावरही भर दिला आहे. अंत्योदय आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळे स्थानिक लोकांचा विश्वास मिळवण्यात यश आले असून, अनेक आदिवासी आता सरकार आणि सुरक्षा दलांच्या बाजूने उभे राहू लागले आहेत. आत्मसमर्पणाला प्रोत्साहन देत आणि त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेत, शहा यांनी मोदी सरकारच्या विकास आणि विश्वासाच्या दृष्टिकोनाला बळकटी दिली आहे.
जेव्हा “भारतीय राजकारणाचे चाणक्य’’ छातीठोकपणे सांगतात की मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद समूळ नष्ट केला जाईल, तेव्हा त्यांच्या कारभाराचा मागोवा घेतल्यास त्यांच्या शब्दांना विशेष वजन प्राप्त होते. अमित शहा आपल्या आश्वासनांवर नेहमीच खरे उतरले आहे आणि ३१ मार्च २०२६ ही फक्त एक तारीख न राहता भारतातील नक्षलवादाचा शेवट करणारा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.