
no images were found
रोहिताश्व गौड यांची सेटवर कबूतरासोबत घडलेली विनोदी घटना
गेल्या दहा वर्षांपासून एण्ड टीव्हीवरील मालिका ‘भाबीजी घर पर है’ विनोदीशैली व विलक्षण पात्रांसह प्रेक्षकांना हसवून-हसवून लोटपोट करत आहे. पण तुम्हाला माहित आहे का, कधी-कधी सेटवरील अनपेक्षित ब्लूपर्समुळे कलाकारांना देखील हसू आवरता येत नाही? सतत इश्कबाजी करणारा मनमोहन तिवारीची भूमिका साकारणारे रोहिताश्व गौड यांनी नुकतेच एक हसून-हसून लोटपोट करणाऱ्या क्षणाबाबत सांगितले, जेथे सेटवरील सर्वजण अचंबित झाले होते. या मजेदार क्षणाला उजाळा देत रोहिताश्व गौड ऊर्फ मनमोहन तिवारी म्हणाले, ”काही वर्षांपूर्वी आम्ही एका सीनचे शूटिंग करत होतो, जेथे मला लपून अनिता भाबीच्या (विदिशा श्रीवास्तव) घरामध्ये प्रवेश करायचा होता आणि म्हणायचे होते की ‘भाबीजी, आप कहें और हम ना आये?’ सर्वकाही सुरळीत होत होते, मी भूमिकेमध्ये सामावून गेलो होतो, कॅमेरा रोलिंग होत होता आणि मी नाट्यमयरित्या माझा हात पुढे सरसावत माझा संवाद म्हणणार होतो, पण नियतीची काही वेगळीच योजना होती. कॅमेऱ्याच्या वर बसलेल्या एका कबुतराने त्याच क्षणी मला चांगलाच प्रसाद दिला आणि त्याची विष्ठा थेट माझ्या हातावर टाकली! मला धक्का बसला, पण काही क्षणात सेटवरील सर्वजण खदखदून हसू लागले. ती वेळ इतकी परिपूर्ण होती की जवळपास स्क्रिप्टेड वाटली! अर्थात, आम्हाला तो सीन कापून पुन्हा करावा लागला, पण तो अनपेक्षित क्षण माझ्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय ब्लूपर ठरला.”
अभिनेते पुढे म्हणाले, ”अशा अनेक आठवणी आहेत, ज्या दररोज माझ्या चेहऱ्यावर आनंद आणतात. मला या मालिकेचा भाग असल्याने धन्य वाटते. या मालिकेमुळे मला अभिनेता म्हणून माझी सर्जनशीलता दाखवण्याची, तसेच प्रेक्षकांमध्ये आनंद पसरवण्याची देखील संधी मिळते. मी या संधीला आशीर्वाद मानतो. मला ही भूमिका साकारायला इतकी आवडते की आयुष्यभर ही भूमिका साकारत राहिन.”