Home शैक्षणिक इतिहास अधिविभागाच्या सर धनजीशा बोमनजी कूपर पारितोषिकांचा प्रथम वितरण समारंभ

इतिहास अधिविभागाच्या सर धनजीशा बोमनजी कूपर पारितोषिकांचा प्रथम वितरण समारंभ

4 second read
0
0
19

no images were found

इतिहास अधिविभागाच्या सर धनजीशा बोमनजी कूपर पारितोषिकांचा प्रथम वितरण समारंभ

 

कोल्हापूर,(प्रतिनिधी):- अनेक महामानव असे आहेत की ज्यांचा इतिहास सर्वार्थाने समाजासमोर आलेला नाही. इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी अशा समाजाला माहिती नसलेल्या इतिहासपुरूषांविषयी संशोधन करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन साताऱ्याच्या कूपर उद्योग समूहाचे मुख्य मानव संसाधन अधिकारी डॉ. नितीन देशपांडे यांनी केले.

कूपर उद्योग समूहाच्या देणगीनिधीमधून शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागासाठी स्थापित ‘सर धनजीशा बोमनजी कूपर पारितोषिक (२०२३-२४)’ या पारितोषिकांचा प्रथम वितरण सोहळा आज विद्यापीठाच्या राजर्षी शाहू संशोधन सभागृहात झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

डॉ. देशपांडे यांनी सर धनजीशा कूपर यांच्यासह कूपर उद्योग समूहाचा वारसा आणि कार्य याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. ते म्हणाले, साताऱ्यामध्ये १०३ वर्षांपूर्वी कूपर यांच्यासारख्या एका पारशी व्यक्तीने येऊन उद्योग उभारणे ही नवलाईची बाब होती. मात्र, तेथून त्यांचा प्रवास हा स्वतःला मराठमोळा म्हणविण्यापर्यंत झाला, हे वैशिष्ट्य ठरले. एकीकडे उद्योजक म्हणून कारकीर्द घडवित असताना दुसरीकडे ब्राह्मणेतर, बहुजनांची संघटना उभारणी करणे आणि दशकभराहून अधिक काळ साताऱ्याचे नगराध्यक्षपद भूषवित राजकारणावरही स्वतःची छाप सोडणे अशा बहुआयामी व्यक्तीमत्त्वाचे ते धनी होते. साधारण १२ वर्षे लोकल स्कूल बोर्डाचे अध्यक्षपद भूषविताना त्यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. त्यांच्या व्यक्तीमत्त्वात अशा प्रकारे उद्योजक, समाजसुधारक आणि राजकारणी या पैलूंचा अनोखा संगम झालेला होता. त्याचा वापर त्यांनी समाजाच्या हितासाठी केला. त्यांचे सुपुत्र नरिमन कूपर यांचे चिरंजीव फारोख कूपर हे त्यांचा वारसा पुढे चालवित असून मोठ्या संघर्षातून त्यांनी समूहाला आज जगभरात ओळख प्राप्त करून दिली आहे. त्यांच्या प्रेरणेतून हा पुरस्कार दिला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, सर धनजीशा कूपर हे राजकारणविरहित व्यापार आणि व्यापारविरहित राजकारण करणारे व्यक्तीमत्त्व होते. राजर्षी शाहू महाराज यांच्यापासून ते कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी त्यांचे दृढ संबंध होते. हा मोठा वारसा आहे. त्यांच्या नावे हा पुरस्कार शिवाजी विद्यापीठात सुरू होत आहे, याचा आनंद आहेच, पण त्यापुढे जाऊन इतिहास विषयाच्या विद्यार्थ्यांना उद्योगाकडून पारितोषिक मिळणे ही इतिहासाचे महत्त्व अधोरेखित करणारी बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी इतिहास अधिविभागात सन २०२३-२४मध्ये विद्यार्थ्यांत सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या सूरज राजेंद्र गवळी आणि विद्यार्थिनींत सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या किरण विजय मुसळे यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. रु. १९,०३१ रोख आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते.

सुरवातीला इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. वर्षा पांढरे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. दत्ता मचाले यांनी आभार मानले. यावेळी इतिहास अधिविभागातील शिक्षक, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर धनजीशा बोमनजी कूपर पारितोषिकाविषयी…

सातारा येथील कूपर कॉर्पोरेशन प्रा.लि. कंपनीकडून सर धनजीशा बोमनजी कूपर यांच्या जीवन व कार्याविषयी संशोधन प्रकल्पासाठी शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागास १२ लाख २७ हजार रुपयांचा निधी सामाजिक दायित्व निधीमधून (CSR) देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सर धनजीशा कूपर यांच्या स्मरणार्थ इतिहास विषयात सर्वाधिक गुणांसह उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनीसाठी दोन पारितोषिके स्थापित करण्यासाठी ७ लाख रुपयांचा निधीही विद्यापीठास दिला आहे. या निधीच्या व्याजामधून ही पारितोषिके प्रदान करण्यात येत आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मुख्य इमारतीमधील नागरी सुविधा केंद्र देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाच दिवस बंद छत्रपती शिव…