no images were found
गड-दुर्ग रक्षण समितीच्या वतीने ३ मार्चला राज्यव्यापी मोर्चा
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांचे रक्षण तसेच संवर्धन व्हावे आणि या गड-किल्ल्यांवरील अतिक्रमण तत्काळ हटवावे, या प्रमुख मागण्यांसाठी गड-दुर्ग प्रेमींच्या राज्यव्यापी मोर्चाचे ३ मार्चला आयोजन करण्यात आले. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात बैठकित हा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्रातील ३५ हून अधिक गडांवर अशा प्रकारची अतिक्रमणे आहेत तसेच पुण्यातील लोहगड, मुंबईतील शिवडी, कुलाबा, माहीम आदी गडांवर अवैध दर्गे, थडगी आणि त्याभोवती संरक्षक भिंती बांधून इस्लामीकरण केले जात आहे आणि पुरातत्त्व विभागाचा गलथान कारभार, या संदर्भात ही बैठक घेण्यात आली.
महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समितीने या मोर्चाचे आयोजन येत्या ३ मार्च रोजी दुपारी १२ वाजता केले असून. मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानपर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. यानंतर आझाद मैदानावर सभा घेतली जाणार आहे. याचदरम्यान राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा आहे. त्यामुळे गड-किल्ले संवर्धनासाठी राज्यात स्वतंत्र महामंडळ असावे, अशी मागणी या सभेतून करण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आहे. आपण या किल्ल्यांवर झालेल्या अतिक्रमणांच्या विरोधात रस्त्यावर आपली ताकद दाखवत नाही, तोपर्यंत कोणतेही सरकार लक्ष देणार नाही. आश्वासने मिळतील परंतु ही आश्वासने पूर्ण होतात की नाही, यावर आपल्याला लक्ष ठेवावे लागणार आहे. गड-किल्ले हा पराक्रमाचा खरा इतिहास आहे, असे सांगत रणजित सावरकर यांनी सर्वांना या मोर्चाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
या बैठकीसाठी हिंदू जनजागृती समितीचे सुनील घनवट, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, धनंजय शास्त्री वैद्य, मुंबई, ठाण्यासह रायगडमधील विविध गडप्रेमी आणि हिंदू संघटना, संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.