no images were found
सांगलीत गांजाची तस्करी टोळी जेरबंद; २०लाखाचा गांजा जप्त
सांगली : सांगलीसह परिसरात विक्रीसाठी गांजाची तस्करी करणार्या टोळीला कवठेपिरान ते सर्वोदय साखर कारखाना रोडवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक करून २० लाख ४० हजारांचा गांजा जप्त केला. या तस्करीसाठी वापरण्यात आलेल्या दोन मोटारीही पोलिसांनी जप्त केल्या.
याबात माहिती देताना पोलीस निरीक्षक सतीश शिंदे म्हणाले गोपनीय माहितीनुसार दोघेजण गांजाची विक्री करण्यासाठी येत असल्याचे पोलिसांना समजले होते. या माहितीच्या आधारे पथकाने कवठेपिरान ते सर्वोदय साखर कारखाना रस्त्यावर सापळा लावला होता. यावेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची आणि इसमांची संशय आल्याने चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने मोटारीची झडती घेतली असता मोटारीमध्ये १०२ किलो वजनाचा तयार गांजा मिळाला. इर्टिगा (एमएच १० बी ७८३३) आणि रिओ प्रिमीअर (एमएच १० बीएम ४५३४) या दोन मोटारींतून गांजा जप्त करण्यात आला. दोन्ही वाहनांसह २८ लाख ९० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
अधीक्षक बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे, उपनिरीक्षक विशाल येळेकर यांच्यासह पथकाने कवठेपिरान गावच्या हद्दीमध्ये आदिल नासीर शहापुरे (वय ३६, रा. कोल्हापूर रोड, सांगली) सचिन बाबासो चव्हाण (वय ३१ रा. कवठेपिरान), मयुर सुभाष कोळी (वय ३३ रा. शंभर फुटी सांगली) व मतीन रफिक पठाण (वय ३१ रा. राधाकृष्ण वसाहत सांगली) यांना गांजा तस्करी प्रकरणी अटक केली. या कारवाईमध्ये जितेंद्र जाधव, राजू शिरोळकर, संदीप पाटील, मच्छिंद्र बर्डे, अमोल ऐदळे, सचिन कनप, राहूल जाधव, अजय बेंदरे, कॅप्टन गुंडवाडे, गौतम कांबळे, प्रविण शिंदे आदींनी सहभाग घेतला होता.