no images were found
पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत उर्वशी ढोलकिया देवी सिंह शेखावतच्या रूपात परतली
सोनी सबवरील ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत पुष्पा (करुणा पांडे) या करारी आणि धडाडीच्या स्त्रीची प्रेरणादायक कहाणी बघताना प्रेक्षक रंगून गेले आहेत. पुष्पा जीवनातील प्रत्येक आव्हानाला अत्यंत दृढ निर्धाराने तोंड देते. अलीकडच्या नवीन कथानकात, पुष्पाच्या संपूर्ण कुटुंबावर आलेल्या संकटात पुष्पाच्या पाठीशी उभे राहण्यासाठी उर्वशी ढोलकियाने पुन्हा मालिकेत दमदार पुनरागमन केले आहे.
‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत एक रोमांचक ट्विस्ट आला आहे आणि एका धक्कादायक संकटातून पुष्पाला आणि तिच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी अगदी योग्य वेळी बुद्धिमान वकील आणि सामाजिक कार्यकर्ती देवी सिंह शेखावतच्या रूपात अभिनेत्री उर्वशी ढोलकिया मालिकेत परत आली आहे. दीप्ती (गरिमा परिहार) आणि अश्विन (नवीन पंडिता) वर हिट-अँड-रन आणि हिऱ्याच्या चोरीचा खोटा आळ आला आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबावर अन्याय होऊन त्यांना तुरुंगात जावे लागले आहे. सगळ्या गोष्टी त्यांच्या विरुद्ध आहेत आणि दिशाभूल करणाऱ्या पुराव्यांमुळे हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे झाले आहे. अशावेळी एका दमदार वकिलाच्या रूपात देवी धावून आली आहे. ती अपराधामागचा मुख्य सूत्रधार शोधून काढून पुष्पाच्या कुटुंबाला पुन्हा सन्मान मिळवून देऊ शकेल का? उर्वशी ढोलकिया मालिकेत दाखल झाल्यामुळे जबरदस्त नाट्य, भावनिक चढउतार आणि न्यायासाठीचा संघर्ष नक्की बघायला मिळणार!
देवी सिंह शेखावतची भूमिका करत असलेली अभिनेत्री उर्वशी ढोलकिया म्हणते, “देवी सिंह शेखावतच्या भूमिकेत ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत पुनरागमन करताना आपल्या घरी परत आल्यासारखे वाटते आहे. देवी पहिल्यापासून एक अत्यंत खंबीर, स्वतंत्र स्त्री आहे आणि ती सत्याच्या बाजूने ठाम उभी असते. यावेळी ती पुन्हा एकदा पुष्पाला अत्यंत गरज असताना तिच्या मदतीस धावून आली आहे. या मालिकेविषयी मला आवडणारी गोष्ट म्हणजे यामध्ये महिला एकमेकींना प्रोत्साहन देतात आणि सक्षम करतात. या जगात, जिथे महिलांना त्यांचा लढा स्वतःच लढावा लागतो, तिथे, अशी एक कहाणी बघायला मला खूप आवडते जिथे महिला एकमेकींचा आधार बनतात. देवी नेहमीच पुष्पाच्या पाठीशी असेल. प्रेक्षकांना ही दमदार कहाणी बघायला नक्की आवडेल अशी मला खात्री वाटते.”