
no images were found
‘शिवाजी विद्यापीठा’च्या नामविस्तारासाठी हिंदूच्या संघटित शक्तीचा अविष्कार : 17 मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाद्वारे धडकणार !
कोल्हापूर (प्रतिनिधी):- कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापीठ’, या नावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपूर्ण उल्लेख असल्याने विद्यापीठाचे नाव अधिक सन्माननीय आणि पूर्ण स्वरूपात ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, असे करण्यात यावे, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु राष्ट्र समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, 17 मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. ‘व्हिक्टोरिया टर्मिनस’ चे नामकरण ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ करण्यात आले, ‘औरंगाबाद’ चे केवळ ‘संभाजीनगर’ नाव न ठेवता ते ‘छत्रपती संभाजीनगर’, अशी नावे बदलण्यात आली आहेत. तर शिवाजी विद्यापीठाला ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असे पूर्ण नाव देण्यास पुरोगाम्यांचे वावडे का ? यातूनच विद्यापीठाच्या नावाचे ‘लघुरूप’ होईल, अशी ‘कथानके’, पसरवली जात आहेत. याउलट या नामविस्तारासाठी समाजातील प्रत्येक स्तरातून व्यापक पाठिंबा मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनधी, आमदार, खासदार, मंत्री यांच्यासह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, गड-दुर्ग प्रेमी, संघटना, संप्रदाय, तरुण मंडळे, शिवप्रेमी संघटना यांनी राज्यभरातून पाठिंबा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 200 हून अधिक ग्रामपंचायतींनी तशा आशयाचे ठराव केले आहेत. *17 मार्चला हा मोर्चा दुपारी 3 वाजता दसरा चौक येथून प्रारंभ होईल. यानंतर तो लक्ष्मीपुरी, व्हिनस कॉर्नर, ‘बी’ न्यूजच्या कार्यालयावरून जिल्हाधिकारी कार्यालय येथे त्याची समाप्ती होईल. तेथे मान्यवरांची भाषणे होतील. तरी या मोर्चासाठी राष्ट्रप्रेमी नागरिक, शिवप्रेमी यांच्यासह समाजातील प्रत्येक घटकाने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत केले.
या पत्रकार परिषदेसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सहसंयोजक श्री. अभिजित पाटील, ‘छत्रपती ग्रुप’चे संस्थापक श्री. प्रमोद पाटील, हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, वीर शिवा काशीद यांचे वंशज श्री. आनंदराव काशीद, हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. राजू तोरस्कर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे श्री. अरुण गवळी, श्री स्वामी समर्थ महालक्ष्मी मंदिराचे श्री. संजय हसबे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते.
श्री. अभिजित पाटील म्हणाले, ‘‘या मोर्चासाठी तेलंगणा येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह, तसेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी, सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.’’
श्री. आनंदराव काशीद म्हणाले, ‘‘या मोर्चासाठी विविध गडदुर्ग प्रेमी, संघटना, मर्दानी खेळाशी संबंधित मंडळे, कार्यकर्ते, इतिहास संशोधक-अभ्यासक यांचा मोठा प्रतिसाद आहे. या मोर्चासाठी राज्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात असलेल्या मावळ्यांचे वंशज उपस्थित रहाणार आहेत.’’
हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती उदयनमहाराज भोसले आणि श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले यांनीही याला पाठिंबा दिला आहे.’’ या प्रसंगी ‘छत्रपती ग्रुप’चे श्री. प्रमोद पाटील म्हणाले, ‘‘या मोर्चासाठी व्यापक स्तरावर प्रचार होत असून समाजातील प्रत्येक स्तराचा पाठिंबा आहे. चेंबर ऑफ कॉमर्स, विविध संस्था, तरुण मंडळे यांसह विद्यार्थी यांनीही या मोर्चात सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे. आम्ही मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होत आहोत.
या मोर्चाला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ने पाठिंबा दिला असू या संदर्भात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’चे अध्यक्ष श्री. ललीत गांधी यांनी कळवले आहे की ‘‘विद्यापीठाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, अशाच पद्धतीनेच दिले गेले पाहिजे, अशी आमची सर्वांची आग्रही भूमिका आहे. त्यासाठी सर्वांनी 2 तास दुकाने बंद करून मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन आम्ही या निमित्ताने करत आहोत.’’
या मोर्चाला ‘श्री’ संप्रदायाने पाठिंबा दिला असून श्री. विजयकुमार पाटील यांनी कळवले आहे की, ‘‘सातारा, सांगली, कोल्हापूरसह बेळगाव येथून ‘श्री’ संप्रदायाचे भक्तगण सहस्रोंच्या संख्येने उपस्थित रहाणार आहेत.’’, तसेच या मोर्चाला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने पाठिंबा दिला असून कोल्हापूर जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव यांनी या मोर्चासाठी धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित रहाणार आहेत, असे कळवले आहे.
विशेष
१. या मोर्चासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात सहभागी असलेल्या सरदार-मावळे यांचे वंशज उपस्थित रहाणार आहेत.
२. या मोर्चात अनेक पथके सहभागी होणार असून यात ढोल-ताशा पथक, मर्दानी खेळ, शिवकालीन युद्धपथक, वारकरी-टाळकरी यांचे पथक, विविध संप्रदायांचे भक्त, मावळ्यांची वेशभूषा यांसह पारंपरिक वेशभूषा, महिलांचे रणरागिणी पथक सहभागी होणार आहे.