Home संशोधन शिवाजी विद्यापीठात एका वर्षात मोती पिकला हो..!  मोत्यांच्या शेतीचा प्रयोग अपेक्षेपलिकडे यशस्वी

शिवाजी विद्यापीठात एका वर्षात मोती पिकला हो..!  मोत्यांच्या शेतीचा प्रयोग अपेक्षेपलिकडे यशस्वी

22 second read
0
0
16

no images were found

शिवाजी विद्यापीठात एका वर्षात मोती पिकला हो..!

 मोत्यांच्या शेतीचा प्रयोग अपेक्षेपलिकडे यशस्वी

 

कोल्हापूर,(प्रतिनिधी): – शिवाजी विद्यापीठाने गतवर्षी २८ फेब्रुवारी रोजी गोड्या पाण्यातील मोत्यांच्या शेतीचा प्रयोग हाती घेतला. हा मोती पिकविण्याचा प्रयोग अपेक्षेपलिकडे यशस्वी झाला असून एका वर्षात मोती निर्माण करण्यात संशोधकांना यशही आले आहे. विद्यापीठात पिकलेला पहिला मोती महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते भेट देण्यात आला आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या गोड्या पाण्यातील मोती संशोधन केंद्राचे समन्वयक तथा प्राणीशास्त्रज्ञ डॉ. नितीन कांबळे यांनी गेल्या वर्षभरात या केंद्रामध्ये झालेल्या संशोधनाविषयी तसेच प्राप्त झालेल्या यशाबद्दल तपशीलवार माहिती दिली. डॉ. कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ फेब्रुवारी २०२४ रोजी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते प्राणीशास्त्र अधिविभागाच्या परिसरात गोड्या पाण्यातील मोती संशोधन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. प्राणीशास्त्राच्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या उपयोजित संशोधन व विकासाची माहिती होण्याच्या दृष्टीने या केंद्राने कार्य करावे आणि त्यापासून मोजक्या विद्यार्थ्यांनी तरी यापासून प्रेरणा घेऊन स्वतःचा मोत्याचा व्यवसाय करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार केंद्राने महाराष्ट्र जैवविविधता मंडळाच्या मान्यतेने या ठिकाणी गोड्या पाण्यातील मोत्यांविषयी संशोधन व विकासाचे काम सुरू केले. मोती या क्षेत्रातील यशस्वी प्रयोगशील उद्योजक दिलीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर प्राण्यांचे संगोपन करण्यास सुरवात केली. योग्य देखभाल आणि संवर्धनामुळे या शिंपल्यांपासून चांगल्या प्रकारचे मोती साकार होऊ लागले आहेत. त्यातील साधारण बारा महिन्यांचा पहिला मोती कुलपती महोदयांना कुलगुरूंच्या हस्ते भेट देण्यात आला. काही मोती शिंपले १८ महिन्यांपर्यंत ठेवण्यात येणार आहेत.

   शिंपल्यांच्या देखभालीबाबत सांगताना डॉ. कांबळे म्हणाले, गतवर्षी आम्ही पाण्यात संवर्धनासाठी सोडलेल्या १०० शिंपल्यांमधील मृत्यूदर अवघा २० टक्के इतका आढळला. म्हणजे शंभरातील ८० शिंपले जगले. सर्वसाधारणपणे यांचा मृत्यूदर हा ४० टक्क्यांच्या घरात असतो. तो कमी करण्यात आपल्याला यश आले. त्यासाठी आपण पाण्याच्या टाकीमधील पाणी नदीप्रमाणे प्रवाही राखले. पाण्यातील ऑक्सिजनची पातळी सातत्याने कायम राखली. पाणी प्रदूषित होणार नाही, याची दक्षता घेत पाण्याचा दर्जा दररोज तपासून त्याचे गुणधर्म कायम राहतील, या दृष्टीने प्रयत्न केले. महत्त्वाचे म्हणजे प्राण्यांची योग्य देखभाल करताना त्यांना आवश्यक त्या प्रमाणात अन्नपुरवठा केली. संशोधनाचा भाग म्हणून दरमहा तीन प्राण्यांचे निरीक्षण केले आणि त्यांचे निष्कर्ष नोंदविले. प्राण्याचे वय, वजन, त्याची संवेदनक्षमता आदी गुणधर्मांचाही अभ्यास केला. त्यांच्या प्रकृतीची योग्य काळजी घेतली. विशेषतः हवेतील दूषित घटक पाण्यात मिसळून त्याला कोणते विकार होणार नाहीत, याचीही काळजी घेतली. प्रि-ऑपरेटिव्ह, ऑपरेटिव्ह आणि पोस्ट ऑपरेटिव्ह या तिन्ही टप्प्यांमधील सर्व प्रक्रिया जंतूसंसर्गविरहित पद्धतीने होतील, याचीही दक्षता घेतली. यामुळे ही प्रक्रिया ९९.०५ टक्के प्राण्यांनी स्वीकारली, हे या प्रयोगाचे महत्त्वाचे यश आहे.

कमी भांडवलात उत्तम व्यवसायाच्या शक्यता

        डॉ. नितीन कांबळे म्हणाले, शिवाजी विद्यापीठातील सर्वच घटकांचे या उपक्रमात भरीव योगदान व कष्ट आहेत. विभागातील भाग-२ चे विद्यार्थी नवीन शैक्षणिक धोरणास अनुसरुन ऑन जॉब ट्रेनिंग आणि कौशल्य आधारित उपक्रम म्हणून मोती संवर्धन केंद्राच्या संशोधन व विकास कार्यात सहभाग नोंदवत आहे. सदर प्रकल्पावर पी.एच. डी.चे संशोधनही सुरू आहे. पारंपरीक शेतीला पर्याय तसेच जोडव्यवसाय म्हणून विद्यार्थी व शेतकरी या क्षेत्राची निवड करू शकतात. मोत्यांची योग्य प्रकारे शेती (लागवड) करून उत्तम आर्थिक नफा मिळू शकतो. योग्य प्रशिक्षण, कठोर नियोजन आणि उत्तम बीज या पासून चांगल्या प्रकारच्या मोत्यांचे उत्पादन मिळते. मोत्यांच्या लागवडीसाठी फारसे भांडवल लागत नाही. केवळ जागा अगर कृत्रिम वा नैसर्गिक तलाव आणि प्राथमिक २५ ते ३० हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून १२ ते १८ महिन्यांच्या कालावधीत ३ ते ४ लाखांचे उत्पन्न मिळू शकते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सौंदर्यालंकार, औषध क्षेत्रामध्ये दर्जेदार मोत्यांना मोठी मागणी आहे.

मोत्यांचा इतिहास आणि निर्मिती

      डॉ. कांबळे यांनी सांगितले की, भारतीय संस्कृतीमध्ये मोत्यांचे महत्त्व केवळ अलंकार म्हणूनच नव्हे, तर आयुर्वेदातही ठळकपणे नमूद आहे. हजारो वर्षांपासून वेगवेगळ्या देशांमध्ये मोती संगोपन, संशोधन व उत्पादन सुरू आहे. समुद्रातील शिंपल्यांपासून मोती तयार होत असल्याचे अनेक ठिकाणी ऐतिहासिक संदर्भ सापडतात. चीनमधील शांघाय प्रदेशात गोड्या पाण्यातील शिंपल्यांसह सवंर्धित मोती तयार करण्याचे प्रयत्न यशस्वी झाले. तेव्हापासून चीन जगातील सर्वात मोठा गोड्या पाण्यातील मोती संवर्धक व उत्पादक देश  बनला. चीनमध्ये दरवर्षी १५०० मेट्रीक टनांपेक्षा जास्त मोती उत्पादन होते.

          मोती (Pearl) हे एक रत्न म्हणून ओळखले जाते. महत्वाचे म्हणजे नेक्रियस मोती प्रामुख्याने मोलस्कन बायव्हल्व्ह किंवा क्लॅमच्या दोन गटांद्वारे तयार केले जाते. सर्व कवचयुक्त मोलस्क नैसर्गिक प्रक्रियेद्वारे जेव्हा एखादया त्रासदायक सूक्ष्म वस्तूला सामोरे जातात, तेव्हा ते प्राण्यांच्या आवरणांच्या पटांमध्ये अडकल्याने नेक्रियस थर स्रवतात. अशा जिवंत प्राण्यांमध्ये मानवी हस्तक्षेपांशिवाय (नैसर्गिकरित्या) किंवा हस्तक्षेप करून (कृत्रिमरित्या) वेगवेगळ्या प्रमाणात आणि विविध क्षमतेचे चमकदार मोती तयार केले जातात, असेही त्यांनी सांगितले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In संशोधन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२५’ पुरस्कार सोहळ्याची घोषणा…

‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२५’ पुरस्कार सोहळ्याची घोषणा…   नवीन वर्षा…