
no images were found
‘उद्योजकतेला प्रोत्साहन आणि सामाजिक समावेशन’ राष्ट्रीय परिषदेस सुरुवात
कोल्हापूर,(प्रतिनिधी): – प्रांत, भाषा यांची बंधने झुगारून यशस्वी उद्योजक होता येते. त्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती आवश्यक असते. कोणत्याही प्रकारच्या व्यवसाय व उद्योजकतेची पार्श्वभूमी नसलेले व्यक्तींनी विविध क्षेत्रातील उद्योग व व्यवसायामध्ये नेत्रदीपक यश मिळविले आहे, असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत व मार्गदर्शक सुहास पालेकर यांनी आज केले.
शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक समावेशन अभ्यास केंद्राच्या वतीने आयोजित ‘उद्योजकतेला प्रोत्साहन आणि सामाजिक समावेशन’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बीजभाषक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते.
सुहास पालेकर यांनी आपल्या बीजभाषणामध्ये जगभरातील व देशातील यशस्वी उद्योजक व व्यावसायिक यांची यशोगाथा व त्यांनी त्यासाठी घेतलेली मेहनत आणि वापरलेले कौशल्य व तंत्रज्ञान याची माहिती दिली. आपणही यशस्वी उद्योजक होऊ शकता, असा आत्मविश्वास त्यांनी विद्यार्थ्यांत निर्माण केला. टाटा, गोदरेज, अमूल डेअरी, कॉटन किंग, इन्फोसिस, माणदेशी फौंडेशन, झोमाटो, अपना बझार इत्यादी उद्योगांची सुरुवात ही शून्यातूनच झालेली आहे. त्यांच्याकडून आपण प्रेरणा घेऊन आपला व्यवसाय वा उद्योग यशस्वी कसा होईल यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अभ्यास केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी केले.
कुलगुरू डॉ. शिर्के अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, प्रत्येक व्यक्ती यशस्वी उद्योजक होऊ शकते. विद्यार्थ्यांनीसुद्धा आता मी यशस्वी उद्योजक होणारच हे गृहीतक मनाशी बाळगून त्याप्रकारची स्वप्ने बाळगून ते प्रत्यक्षात येण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. उद्योजकतेतून जास्तीत- जास्त लोकांना रोजगार मिळणे व त्यातून सामाजिक समावेशन शक्य आहे.
या राष्ट्रीय परिषदेस देशभरातून प्राध्यापक, संशोधक व अभ्यासक सहभागी झाले असून त्यांनी उद्योजकता विकास, उद्योजकता विकासाला पूरक संस्था व आवश्यक वातावरण निर्मिती, महिलांसाठी उद्योजकता विकास, कृषी विकास आणि शास्वत विकासाचे धोरण, उद्योजकतेद्वारे सामाजिक समावेशन, शिक्षण आणि कौशल्य विकास, उद्योजकतेसाठी आवश्यक अर्थसाह्य, सर्वसमावेशक विकासासाठी सूक्ष्म उद्योजकता इत्यादी विषयावर ते शोधनिबंध सादर केले. तसेच, या विषयातील तज्ज्ञ व अभ्यासक प्रा. भूमित शहा, प्रा. तेजपाल मोहरेकर यांनी मांडणी केली.
अविनाश भाले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. तेजपाल मोहरेकर यांनी आभार मानले. यावेळी डॉ. प्रकाश कांबळे, डॉ. दीपा इंगवले, डॉ. केदार मारुलकर, डॉ. भूमित शहा, प्रा. एस. एस. भोला आदी उपस्थित होते.