
no images were found
“माझ्या शरीरयष्टीचा कायापालट करणे हे मोठे आव्हान – माहिर पांधी
सोनी सबवरील आगामी पौराणिक मालिका ‘वीर हनुमान’ प्रेक्षकांच्या मनात भक्तिरस उत्पन्न करून त्यांना एका विलक्षण प्रवासाला आपल्या सोबत घेऊन जाण्यासाठी सज्ज आहे. 11 मार्चपासून सुरू होत असलेली ही मालिका दर सोमवार ते शनिवार रात्री 7.30 वाजता सोनी सबवर प्रसारित करण्यात येणार आहे. दमदार कथानक आणि जबरदस्त व्यक्तिरेखा यांच्या माध्यमातून वीर हनुमानाची कहाणी या मालिकेतून उलगडणार आहे. मालिकेतील अभिनेत्यांच्या विशाल संचात माहिर पांधीचे नाव देखील सामील झाले आहे. हा प्रसिद्ध अभिनेता वाली आणि सुग्रीव या अगदी विरुद्ध स्वभावाच्या दोन भावांची भूमिका करताना दिसणार आहे.
आजच्या काळात अनेक अभिनेते आपले शरीर सडपातळ ठेवण्यासाठी नाना तऱ्हेचे उपाय करत असतात. अशा वातावरणात आपल्या कलेबाबतच्या निष्ठेमुळे आणि आपल्या व्यक्तिरेखेत अस्सलता आणण्याच्या त्याच्या कसबामुळे माहिर उठून दिसतो. सुग्रीव आणि वाली या दोन अती बलाढ्य भावांची व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत करण्यासाठी त्याने वजन वाढवण्याचा चंग बांधला आहे. या दोघांपैकी वालीची ताकद अफाट होती, त्यामुळे त्याचे वर्चस्व होते, तर सुग्रीव मात्र लवचिक आणि इमानी होता. या दोन अगदी भिन्न व्यक्तिरेखा साकारण्यासाठी माहिरला बरीच शारीरिक आणि भावनिक तयारी करावी लागली.
एखाद्या भूमिकेसाठी शरीरात असा बदल घडवून आणणे ही काही सोपी बाब नाही. आणि माहिरने या दोन वेगळ्या स्वभावाच्या व्यक्तिरेखा साकारण्यासाठी जी तयारी केली आहे, त्यावरून तो किती प्रेरित आहे हे दिसून येते. आपला अनुभव शेअर करताना माहिर म्हणतो, “या भूमिकेसाठी स्वतःची शरीरयष्टी बदलणे हे एक आव्हान होते, पण तसे करण्याची प्रेरणाही प्रबळ होती. स्नायूंच्या बळकटीसाठी मी स्क्वॉट्स, डेडलिफ्ट्स, शोल्डर प्रेस, बेंच प्रेस आणि रोज यांसारख्या मिश्रित व्यायामावर भर दिला. पोषणाचे विशेष महत्त्व आहे. दर काही तासांनी खायला पाहिजे हे पथ्य पाळले. कार्ब्ज आणि चांगली चरबी खाण्यावर भर दिला आणि त्याच वेळी वाढते वजन सांभाळण्यासाठी शरीराला पुरेशा कॅलरीज मिळतील याची खातरजमा केली. आणखी एक घटक आहे, झोप- ज्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. स्नायू वाढवण्यासाठी कमीत कमी 8-9 तासांची झोप घेणे आवश्यक होते. सध्या आम्ही गुजरातच्या सीमेजवळ शूटिंग करत आहोत. वालीचा लुक कायम राखण्याचे मोठे आव्हान इथे आहे. पण ही व्यक्तिरेखा जशी रेखाटली आहे, तितकीच प्रभावी ती पडद्यावर दिसावी यासाठी काहीही करण्याची माझी तयारी आहे.”