
no images were found
ठाकरे गटाची कथित बोगस शपथपत्र मुंबई क्राईम ब्रांचचे पथक कोल्हापुरात दाखल
कोल्हापूर : ठाकरे यांच्या समर्थनात दिलेली सुमारे साडे चार हजार प्रतिज्ञापत्र बोगस असल्याचा आरोप शिंदे गटाकडून केला जात आहे. पोलीस अधीक्षकांचे कार्यालयामध्ये या प्रकरणाचा तपास केला जाणार आहे. ठाकरे गटाच्या शपथपत्रांवर शिंदे गटाने आक्षेप घेतला असून निवडणूक आयोगाकडे दोन्ही गटांकडून लाखो शपथपत्र सादर झालेली आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची चार पथक कोल्हापूर, पालघर, अहमदनगर आणि नाशिकमध्ये पोहोचली आहेत.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक कोल्हापूरमध्ये पोहोचले असून पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयामध्ये या संपूर्ण बाबींचा तपास केला जात आहे. ठाकरे गटाची जवळपास साडेचार हजार प्रतिज्ञापत्र ही बोगस असल्याचा आरोप शिंदे गटाने केल्यानंतर याप्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखेने आता आपला तपास सुरु केला आहे. दरम्यान, कोल्हापुरात दाखल झालेले मुंबई क्राईमचे दीपक सावंत यांनी बोलताना मुंबईच्या निर्मल नगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत आम्ही येथे तपासणी करण्यासाठी आलो असून ठाकरे गटाच्या शपथपत्रांविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. कोल्हापूरमध्ये सध्या १४०० ते १५०० शपथपत्र तपासणी करणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं आहे.
आम्ही सर्व शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे प्रतिज्ञापत्र दिली आहेत. त्यामुळे मुंबई क्राईम ब्रँचला आमचे सर्व ते सहकार्य राहील. ज्या जिल्ह्यांमध्ये सरकार विरोधात जास्त आंदोलन केली जातात त्या जिल्ह्यांमध्ये ही कारवाई केली जाते. असे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी म्हटलं आहे.