no images were found
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भव्य असे भीमा कृषी व पशू प्रदर्शन 2026 : मेरी वेदर मैदानावर १३ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी दरम्यान आयोजित: खासदार धनंजय महाडिक यांची माहिती
५ फूट इग्वाना, १२ लाखांचा खिल्लार खाँड, १४०० किलोचा मुरा रेडा ठरणार आकर्षण
कोल्हापूर(प्रतिनिधी):पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भव्य असे भीमा कृषी व पशु प्रदर्शन येत्या १३ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत कोल्हापूरातील मेरी वेदर मैदानावर येथे आयोजित करण्यात आले असून, यंदाचे हे प्रदर्शन १८ वे वर्ष असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.
शेतकरी, पशुपालक व कृषी व्यावसायिकांसाठी पर्वणी ठरणाऱ्या या प्रदर्शनात यंदा अनेक दुर्मिळ व वैशिष्ट्यपूर्ण पशू आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहेत. कोल्हापूरमध्ये प्रथमच पाच फूट लांबीचा इग्वाना (सरडा) या प्रदर्शनात दाखल होत असून तो प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.
याशिवाय, बैलगाडा शर्यतीमधील प्रसिद्ध ‘हरण्या’ बैल, तब्बल १२ लाख रुपये किमतीचा खिल्लार खाँड, १४०० किलो वजनाचा मुरा रेडा, तसेच दररोज ३० लिटर दूध देणारी एच.एफ. गाय या पशूंमुळे प्रदर्शनाला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
या कृषी व पशु प्रदर्शनाच्या माध्यमातून आधुनिक शेती तंत्रज्ञान, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, सुधारित वंशवृद्धी, शेतकी अवजारे तसेच शेतकऱ्यांना थेट लाभदायक ठरणाऱ्या विविध संकल्पना एकाच ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे आणि शेतकऱ्यांना नव्या संधी उपलब्ध करून देणारे हे प्रदर्शन निश्चितच मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.
यावर्षीच्या भिमा कृषी प्रदर्शनास कृषी विभाग व किसान कल्याण मंत्रालय, कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य, पशुसंवर्धन विभाग, आत्मा, जिल्हा परिषद कोल्हापूर, वृंदावन फाउंडेशन आणि कोल्हापूर ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. तरी या प्रदर्शनाचा कोल्हापूर तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.
यावेळी पत्रकार परिषदेला प्रा. जे. पी. पाटील, डॉ. अजित शिंदे, डॉ. सुनिल काटकर, सर्जेराव धनवडे दादा, अशोक सिधनेलें, केले आहे इंद्रजीत जय जिल्हा कृषी अधीक्षक नामदेव परिट, कृषी अधिकारी युवराज पाटील आदी उपस्थित होते.