no images were found
आमच्याशिवाय सत्तास्थापन होऊ शकत नाही!
महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली आहे. बुधवारी मतदान प्रक्रिया संपल्यावर एक्झिट पोल जाहीर करण्यात आले. येत्या २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. तत्पूर्वी एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. बुधवारी जाहीर झालेल्या प्रमुख १० पैकी सहा एक्झिट पोल्सनी महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे. तर तीन एक्झिट पोल महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत. एका एक्झिट पोलमधून अंदाज वर्तवण्यात आला आहे की राज्यात त्रिशंकू परिस्थिती होईल. या निवडणुकीत नेमकं काय होईल ते शनिवारी (२३ नोव्हेंबर) स्पष्ट होईल. दरम्यान, महायुतीच्या नेत्यांना विश्वास आहे. की राज्यात त्यांचच सरकार येईल. अशातच काही महिन्यांपूर्वीपर्यंत महायुती सरकारमध्ये असलेल्या, भाजपा-शिवसेनेच्या (शिंदे) मित्रपक्षाने मात्र आमच्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही, असा दावा केला आहे. प्रहार जनशक्ती पार्टी असं या पक्षाचं नाव असून या पक्षाचे प्रमुख तथा अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी हे वक्तव्य केलं आहे.
आमदार बच्चू कडू म्हणाले, “भाजपाने आमच्या मतदारसंघात खूप ताकद लावली, अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन प्रचार केला. परंतु, अखेरपर्यंत ते संभ्रमात होते. सुरुवातीला काँग्रेस भाजपाबरोबर होती, मग भाजपा काँग्रेसचं समर्थन करत होती. कारण दोन्ही पक्षांचं उद्दीष्ट एकच होतं, ते उद्दीष्ट म्हणजे बच्चू कडूला पाडणं. ते दोघे एकमेकांशी लढताना बच्चू कडूला पाडण्याचं उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून काम व प्रचार करत होते. त्या दोन्ही पक्षांचे उमेदवार स्वतः निवडून येण्यापेक्षा मला पाडण्याचाच विचार करत होते. जिंकण्यापेक्षा मला पाडणं ही त्यांची प्राथमिकता होती. मात्र, मला सर्वांना सांगायचं आहे की आमचा विजय पक्का आहे”.
विधानसभेचे एक्झिट पोल पाहता महायुती व महाविकास आघाडीमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळू शकते. अशा स्थितीत अपक्ष व इतर लहान पक्षांची भूमिका महत्त्वाची असेल असं चित्र दिसू लागलं आहे. सत्तास्थापनेत लहान पक्षांना, अपक्षांना मोठा वाटा मिळू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.