no images were found
३० वर्षांनंतर पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान !
मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीसाठीच मतदान २० नोव्हेंबरला पार पडलं. राज्यात विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान झालं. यावेळी मतदानादिवशी नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा महाराष्ट्रात ६५.११ टक्के मतदान झाले, जे गेल्या ३० वर्षांतील सर्वाधिक मतदान आहे. यापूर्वी ११९५ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ७१.६९ टक्के मतदान झाले होते.
या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ६१.३९ टक्के मतदान झाले. तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ६१.४ टक्के मतदान झाले होते. महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी वाढल्याचे श्रेय मुख्यकरुन सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या प्रचाराला दिली जात आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला एकूण ४२.७१ टक्के मते मिळाली, तर महाविकास आघाडीला ४३.९१ टक्के मते मिळाली होती.
यंदा मतदानाच्या टक्केवारीत किमान ३.५ टक्क्यांची वाढ झाली आहे. या वेळी महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार यासाठी मतदानाची वाढलेली टक्केवारी निर्णायक ठरु शकते. २०१९ मध्ये महाराष्ट्रात ८.८५ कोटी मतदार होते, जे २०२४ मध्ये वाढून ९.६९ कोटी झाले आहेत. त्यापैकी ५ कोटी पुरुष आणि ४.६९ महिला मतदार आहेत. यंदा ४१३६ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये ३७७१ पुरुष तर ३६३ महिला उमेदवार आहेत.
अधिक मतदानाचा फायदा सत्ताधारी महायुतीला होऊ शकतो, असं बोललं जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्या-ज्यावेळी मतदानाचा टक्का वाढला आहे, त्याचा फायदा भाजपला झाला आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढली आहे. याचा फायदा भाजप आणि महायुतीला होणार आहे.
तर, महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मविआ निवडणूक जिंकणार आहे. लोकांमध्ये उत्साह आहे. महाराष्ट्रातील स्वाभिमानी नागरिक राज्याच्या हिताला प्राधान्य देणारे सरकार निवडून देतील. काँग्रेस पक्ष राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणे निश्चित आहे.