no images were found
बेल्जियमचे आर्थिक शिष्टमंडळ मुंबई दौऱ्यावर येणार : बेल्जियम वाणिज्यदूतांची माहिती
मुंबई : बेल्जियमचे राजे फिलिप यांच्या भगिनी असलेल्या प्रिन्सेस ऍस्ट्रिड यांच्या नेतृत्वाखाली बेल्जीयम येथील व्यापार – उद्योजकांचे आर्थिक शिष्टमंडळ (बेल्जियन इकॉनॉमिक मिशन) येत्या मार्च महिन्यात भारत भेटीवर येणार आहेत. यावेळी मिशनचे सदस्य दिल्लीसह मुंबईला भेट देणार असल्याची माहिती बेल्जियमचे मुंबईतील वाणिज्यदूत फ्रॅंक गिरकेंस यांनी आज येथे दिली.
वाणिज्यदूत फ्रॅंक गिरकेंस यांनी सोमवारी (दि. २१) राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. बेल्जियमचा महाराष्ट्र आणि गुजरातशी हिऱ्यांचा मोठा व्यापार आहे. बेल्जियम आता भारताशी लॉजिस्टिक्स, उत्पादन व आरोग्य सेवा क्षेत्रात सहकार्य वाढवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी सेमीकंडक्टर व्यापाराबद्दल देखील चर्चा होऊ शकते असे वाणिज्यदूतांनी सांगितले.
बेल्जियम आरोग्यसेवा क्षेत्रात अग्रेसर असून या क्षेत्रात आपण सहकार्य वाढविणार असल्याचे फ्रॅंक गिरकेंस यांनी सांगितले. भारत युरोप व्यापार वाढविण्याबाबत फेडरेशन ऑफ युरोपिअन बिझनेसेस इन इंडिया (फेबी) काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. कौशल्य वर्धन या क्षेत्रात देखील बेल्जियम महाराष्ट्रातील कौशल्य विद्यापीठाशी सहकार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले. भारत व युरोपमधील मुक्त व्यापार धोरण लवकर मंजूर झाल्यास त्याने उभयपक्षी व्यापार दुपटीने वाढेल असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी सांगितले.