
no images were found
जळगाव कोरोनाकाळातील मृतांच्या दफनविधीत अपहार !
जळगाव : कोरोनाकाळात मृत झालेल्या रुग्णांच्या दफनविधीचा खर्च त्यांच्या नातलगांनी केलेला असताना खोटी बिले सादर करून जळगाव महापालिकेकडून एक लाख ९४ हजार २५० रुपयांचा निधी कब्रस्तान व ईदगाह ट्रस्टने वसूल केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संस्थेचे सचिव फारूख शेख अब्दुल्ला यांच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव मुस्लिम कब्रस्तान कमिटीचे सदस्य शेख मुश्ताक अहमद मोहंमद इक्बाल (वय ४६, रा. सालारनगर) यांनी औरंगाबादच्या न्यास वक्फ बोर्डाकडे तक्रार दिली आहे आणि त्याच स्वरूपाचा मजकूर एफआयआरच्या स्वरूपात पोलिस ठाण्यात दिला. त्यानुसार मुस्लिम समाजाच्या मृत कुठल्याही व्यक्तीच्या कफन व दफनविधीसाठी लागणारा खर्च, कबरीमध्ये लावण्यात येणाऱ्या लाकडी फळ्या (बरगे) याची कुठलीही जबाबदारी न्यासवर नाही. हा संपूर्ण खर्च मृताच्या नातेवाइकांकडून करण्यात येतो. असे असताना एप्रिल २०२० ते ऑक्टोबर २०२० दरम्यान मुस्लिम कब्रस्तानात एकूण ४२० मृत व्यक्तींवर दफनविधी करण्यात आला होता.
मृतांच्या कबरीसाठीचे खोदकाम, लाकडी फळ्या (बरगे) यांचा खर्च केला. उलट कब्रस्तान ट्रस्टची रीतसर पावतीही फाडली. असे असताना कब्रस्तान ट्रस्ट व न्यासने याबाबत खर्च केल्याची कुठली नोंदही नाही. तरीही शेख फारूख शेख अब्दुल्ला यांनी १० नोहेंबर २०२० ला जळगाव महापालिका आयुक्तांच्या नावे रीतसर त्यांच्या स्वाक्षरीचे लेखीपत्र देऊन कोरोनाकाळात मृताच्या दफनविधीसाठीच्या खर्चाची मागणी केली. त्यासाठी महापालिकेकडे वेगवेगळी बिले सादर केली. मुस्लिम कब्रस्तान व ईदगाह ट्रस्टच्या माध्यमातून कोरोनाबाधित मृताच्या दफनविधीच्या खर्चापोटी ट्रस्टचे सचिव शेख फारूख शेख अब्दुल्ला यांच्या स्वाक्षरीच्या माध्यमातून सादर केलेल्या १११ मृतांच्या दफनविधीच्या खर्चापोटी प्रत्येक व्यक्ती एक हजार ७५० रुपयांप्रमाणे, असे एकूण एक लाख ९४ हजार २५० रुपयांचा खर्च महापालिकेने ८ ऑगस्ट २०२२ ला मंजूर करून तो कब्रस्तान ट्रस्टच्या खात्यात वर्ग केला आहे. कोरोना मृतांवर केलेला कुठलाही खर्च ट्रस्टने केल्याचा कोणताही ठराव अगर हिशेब उपलब्ध नाही, अगर त्याचा लेखापरीक्षणातही उल्लेख नाही. फारूख शेख यांनी महापालिकेची दिशाभूल करून व खोटा पत्रव्यवहार करून फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. अखेर शेख मुश्ताक अहमद मोहंमद इक्बाल (वय ४५) यांनी सोमवारी (ता. ५) दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात फारूख शेख व अन्य संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.