
no images were found
जळगाव जामोदचे गावकरी मध्य प्रदेशात जाणार?
बुलडाणा : महाराष्ट्र कर्नाटकमधील सीमावाद पेटला असताना महाराष्ट्र – मध्य प्रदेश, महाराष्ट्र – गुजरात अशी सीमेलगत असलेली गावंही शेजारील राज्यात जाण्याची मागणी करत आहेत. आपले म्हणणे सरकार दरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न यातून ते करत आहेत. जिल्ह्यातील काही गावांना अनेक वर्षांपासून वीज, पाणी रस्त्याच्या समस्या भेडसावत आहेत. यामुळे जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील सातपुडा पायथ्याशी बसलेल्या काही आदिवासीबहुल समाज भागातील लोकही मध्य प्रदेशात जाण्याची मागणी करत आहेत. कारण मध्य प्रदेशची सीमा इथून काही किलोमीटर अंतरावर आहे. आणि विकासासाठी ते मध्य प्रदेश सरकारकडे आपले डोळे लावून बसले आहेत. यामुळे सीमेलगतच्या गावांमुळे आधीच राज्य सरकारची डोकेदुखी असताना त्यात आणखी भर पडली आहे.
जळगाव जामोद तालुक्यातील मध्य प्रदेशच्या सीमेवरील चार गावातील नागरिकांची मध्य प्रदेशात समावेश करण्याची मागणी आहे. सीमेवरील या गावांना मूलभूत सुविधा जसे शिक्षण, आरोग्य, वीज, रस्ते आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याने या गावातील नागरिकांनी ही मागणी केली आहे.
जळगाव जामोद तालुक्यातील भिंगारा, गोमाल १, गोमाल २, चाळीस टपरी अशा या गावांची नावं आहेत. गावातील नागरिक उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदनही देणार आहेत. हे सर्व गाव मध्य प्रदेशच्या सीमेवर असून आदिवासी भागातील आहेत. कर्नाटकसोबतचा सीमावाद तापला असताना बुलडाण्यातील सीमेलगतच्या गावकऱ्यांनी मध्य प्रदेशात जाण्याचा इशारा दिल्याने राज्य सरकार समोर आणखी एक समस्या निर्माण झाली आहे.
जळगाव जामोद शहर हे सातपुड्याच्या कुशीत आहे. यामुळे या शहराला सातपुडा नगरी म्हणून संबोधले जाते. सातपुड्यात भिंगारा हे थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण आहे. एकेकाळी शिवाजीमहाराजांचे वास्तव्य असलेला मैलगडसुद्धा आहे. जामोद हे एक ऐतिहासिक वारसा असलेले गाव आहे.