
no images were found
श्रीमद् रामायण’ मालिकेत सीतेला पळवण्याचा सहस्ररावणाचा डाव उधळणार लव आणि कुश
सोनी सबवरील ‘श्रीमद् रामायण’ ही श्रीराम (सुजय रेऊ) आणि सीता (प्राची बंसल) यांचे जीवनचरित्र विशद करणारी मालिका आहे. अलीकडच्या भागांमध्ये प्रेक्षकांनी पाहिले की, लव (शौर्य मंडोरिया) आणि कुश (अथर्व शर्मा) आता मोठे झाले आहेत आणि दंगा करू लागले आहेत. सीता माता त्यांच्या मस्तीला आळा घालून त्यांना शिस्त लावण्याचे प्रयत्न करताना दिसत आहे. त्यांना वळण लावण्यासाठी ती लव आणि कुशला आश्रमात राहणाऱ्या लोकांसाठी पाणी भरून आणायला नदीवर पाठवते.
आगामी भागांमध्ये प्रेक्षक बघतील की, सीतेला पळवण्यासाठी तब्बल 12 वर्षे दबा धरून बसलेल्या सहस्ररावणाला (प्रणीत भट्ट) लव आणि कुश आश्रमाच्या बाहेर गेल्यामुळे हवी असलेली संधी मिळते. त्या दोन छोट्या भावांना आश्रमाच्या बाहेरच पकडण्याचे तो ठरवतो. त्यांचा जीव धोक्यात असल्याचे समजल्यावर सीता आपोआप बाहेर येईल, असे त्याला वाटते. लव आणि कुशला पकडण्यासाठी सहस्ररावण आपल्या राक्षसांना नदीवर पाठवतो पण अकारण गुंगी येऊ लागते, तेव्हा लव आणि कुश यांना समजते की काहीतरी गडबड आहे.झटपट विचार करून ते त्यांच्या घागरींवर श्रीरामाचे नाव लिहितात, ज्यामुळे त्यांचे रक्षण होते आणि ते सुखरूप आश्रमात परततात. अशा प्रकारे सहस्ररावणाचा डाव फसतो.
‘श्रीमद् रामायण’ मालिकेत सीतेची भूमिका करणारी प्राची बंसल म्हणते, “रामापासून दूर, एकटीने आश्रमात राहून लव आणि कुश यांचा सांभाळ करणे ही सीतेसाठी तिच्या सोशिकतेची आणि प्रेमाची कसोटी आहे. लव आणि कुशचा सांभाळ करताना सीता ही त्यांच्या मस्तीला आळा घालून त्यांना प्रेमाने शिस्त लावणारी, मार्गदर्शन करणारी आणि आसपासच्या धोक्यांपासून त्यांचे संरक्षण करणारी आई असते. आगामी भागांमध्ये सहस्ररावणाचा धोका आसपास असताना लव आणि कुश यांच्या हुशारीची परीक्षा होणार आहे. तसेच, सीतेने कोणत्याही संकटाला तोंड देण्यासाठी लव आणि कुशला तयार केले आहे, त्यामुळे ही तिच्या संगोपनाची देखील परीक्षा आहे.”